नगर -शहरातील वाहतूक नियंत्रित करण्याच्या उद्देशाने चौकात बसविलेली सिग्नल यंत्रणा कोलमडली आहे. महत्त्वाच्या चौकांतील सर्वच सिग्नल बंद आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली आहे. चौकासह उड्डाणपुलाखाली बसविलेले सिग्नल देखील बंद आहेत. सिग्नल बंद असल्याने वाहतूक अनियंत्रित झाली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात येत असली, तरी नागरिक मात्र शहाणे झाल्याचे दिसत नाही. भरधाव वाहन चालवणे, चौकातून चुकीच्या पद्धतीने गाडी चालवून वाहतुकीस अडथळा करणे, सिग्नल सुरू असला तरी येथे थांबायचे नाही, असे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावायची कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील बसस्थानके प्रवाशांनी गजबजली आहेत. दुसरीकडे रस्त्यावरील वाहनांची संख्याही वाढली आहे. पुणे, औरंगाबाद, नाशिक मार्गांवर वाहनांची गर्दी झाली आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सिग्नलची आवश्यकता आहे; परंतु सिग्नल बंद आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली आहे. काही ठिकाणी वाहतूक पोलिस वाहतुकीचे नियोजन करत आहेत. शहरातून जाणाऱ्या नगर औरंगाबाद, पुणे, मनमाड या महामार्गांवर वाहनांची जास्त वर्दळ आहे. येथील सिग्नलही बंद आहेत.
शहरांतर्गत रस्ते या महामार्गांना येऊन मिळतात. या महामार्गांवरील सक्कर चौक, स्वस्तिक बसस्थानक, कायनेटीक चौक, माळीवाडा बसस्थानक येथील सिग्नलही बंद आहेत. त्यामुळे येथील वाहतुकीची समस्या जटील झाली आहे. त्यातही बहुतांशी सिग्नलचे दिवे गायब झाले असून काही दिव्यांचे खांब तुडले आहेत.
चौकातील सिग्नल दुरुस्त करून वाहतूक नियंत्रित करण्याच्या सूचना देण्यात येतात. त्यानुसार कार्यवाही मात्र होत नाही. काही वेळेस सिग्नल दुरुस्त केले, तरी काही दिवसांत सिग्नल पुन्हा बंद पडतात. त्यामुळे ही समस्या अद्यापही कायम आहे. झेब्रा क्रॉसिंगचे पट्टेही मारले नसल्याचे दिसून आले. काही ठिकाणी तर सिग्नलचे खांब पडण्याच्या बेतात आले आहेत. अशा धोकादायक खांबाच्या दुरुस्तीबाबत सुरू असलेली अनास्था अद्याप संपलेली नाही.
रस्त्यांची चाळण, स्पीडब्रेकर उखडले
शहरातील सिग्नल बंद असल्याने वाहतूक विस्कळित झाली आहे, तर दुसरीकडे खराब रस्त्यांनीही वाहतुकीत अडथळा निर्माण केला आहे. रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत. एकही रस्ता धड नाही, अशी स्थिती आहे. रस्ते एवढे खराब असताना त्यांच्या दुरुस्तीचे कामही प्रशासनाने हाती घेतलेले नाही. रस्त्यातील स्पीडब्रेकर खराब झाले आहेत. त्यामुळे वाहतूक धोकादायक झाली आहे. या नागरी समस्यांकडे मात्र कुणीही लक्ष द्यायला तयार नाही, असे दिसत आहे.