शनिशिंगणापूर -सलग सुट्या आल्याने शनिशिंगणापूर येथे भाविकांची तोबा गर्दी झाली असून, शनिदर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. गुरुवारी पहाटेपासूनच शनिभक्तांच्या वाहनांचा ताफा शनिशिंगणापूरला जाताना दिसत होता. राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावर भाविकांच्या वाहनांची गर्दी झाली होती. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. या वेळी देवस्थान समितीतर्फे भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते. सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र करपे यांनी या वेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
शनिदेवाला विविध फुलांनी सजवण्यात आले होते. या वेळी शनिभक्तांसह विविध मान्यवर शनिदर्शन घेण्यासाठी दाखल झाले. दर्शन रांगेत शनिदेवाचा जयजयकार केला जात होता. सर्व दुकाने हाउसफुल झाली होती. राहुरी-शनिशिंगणापूर या रस्त्यावर रोज अपघाताची मालिका सुरू असून, या मार्गावर दिशादर्शक फलक लावावेत, तसेच वाहनचालकांनी वेग संतुलित ठेवून आनंददायी प्रवास करण्यासाठी प्रयत्न करावा, महत्त्वाच्या ठिकाणी सिग्नल उभारण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. विशेष अतिथींचे स्वागत अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर,सरचिटणीस आप्पासाहेब शेटे, सरपंच बाळासाहेब बानकर यांच्यासह देवस्थानच्या विश्वस्तांनी केले.
शनिभक्तांना मनःस्ताप
सध्या भाविकांची गर्दी असताना तेथे चालू असलेल्या नाल्याचे काम, रस्त्यावर पडलेली दगड-माती, त्यात पावसाने झालेली दलदल पाहता येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला व पार्किंग व्यवस्था कोलमडून पडली. वाहनाची मोठी वाहतूक असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.