कोलकाता – बंगली अभिनेत्री व लोकप्रिय मॉडेल बिदीशा डे मुजुमदार हिचा कोलकात्यातील नागरबाजारयेथील राहत्या घरात मृतदेह आढळून आला आहे. बंगाली अभिनेत्री पल्लवी डेच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच आणखी एका 21 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने बंगाली चित्रपटसृष्टी हादरली आहे.
अभिनेत्री बिदीशा ही आपल्या आई वडिलांसोबत भाड्याने एका अपार्टमेंटमध्ये राहात होती. बुधवारी बिदीशा आपल्या राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास पोलीसांनी करण्यास सुरुवात केली आहे. पोलिस अभिनेत्रीच्या कुटुंबियांसोबतच तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींचीदेखील चौकशी करत आहेत. ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र पोलीस अद्याप शविच्छेदन अहवालाची वाट पाहात आहेत.
बिदीशा ही एक लोकप्रिय मॉडेल होती. मॉडेलिंग विश्वात तिचं मोठं नावं होतं. 2021 मध्ये अनिरबेद चटोपाध्याय दिग्दर्शित ‘भार: द क्लाऊन’ या शॉर्ट फिल्ममधून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. या शॉर्ट फिल्ममध्ये प्रसिद्ध बंगाली अभिनेता देबराज मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसला होता.