शिरूर (प्रतिनिधी) – कोरोना व्हायरसचा आहाकार सगळीकडे असताना या काळात लग्न बंधनात अडकत असताना, राष्ट्रीय कर्तव्याचे भान ठेवत लग्नाच्या गाठीत बांधण्या अगोदर रामलिंग शिरूर येथील गणेश विष्णुपंत दसगुडे यांनी होणारी पत्नी प्रणिती हिच्याशी लग्नाच्या सात फेऱ्यात अडकण्या अगोदर राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी शिरूर तहसीलदार कार्यालयामध्ये येऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 21 हजाराची मदत केली आहे.
हा एकवीस हजाराचा निधीचा धनादेश त्यांनी शिरूर प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी तहसीलदार लैला शेख, शिरूरचे मंडलाधिकारी निलेश घोडके, कामगार तलाठी विजय बेंडभर, सोन्याबापु दसगुडे, पोपट दसगुडे आदी उपस्थित होते.
शिरूर रामलिंग येथील प्रसिद्ध गाडामालक विष्णुपंत धोंडीबा दसगुडे यांचा मुलगा गणेश व केंदूर येथील प्रसिद्ध गाडा मालक शिवाजीराव डुकरेपाटील यांची कन्या प्रणिती या दोघांचा शुभविवाह आठ मे रोजी कोरोनाव्हायरस येण्याअगोदर ठरला होता. परंतु कोरोनाव्हायरस चे संकट देशासह राज्यावर, जिल्ह्यावर, तालुक्यावर आल्याने त्यामुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नियम व अटी यांचे पालन करून हा विवाह आज गोरख मुहूर्तावर करण्याचे ठरलं होते. परंतु हा शुभविवाह होण्याअगोदर प्रसिद्ध गाडामालक विष्णुपंत दसगुडे यांनी राज्यावर आलेल्या कोरोनाव्हायरसचे संकट मोठे गंभीर आहे हे ओळखून मुलाच्या विवाह मधील काही रक्कम सामाजिक बांधिलकी म्हणून मदत देण्याचे ठरविले.
त्याप्रमाणे लग्न होण्या अगोदर दुपारी होणारे नवं-वधुवर यांनी शिरूर तहसीलदार कार्यालय गाठले. तेथे त्यांनी 21 हजार रुपयांचा निधी प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख व तहसीलदार लैला शेख यांच्याकडे सुपूर्द करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान हे नववधू लग्न बंधनात बांधले गेले. तेही शासनाने नेमून दिलेल्या सामाजिक डिस्टन्सिंग नियम पाळत व घरातील मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत.
देशासह राज्यावर आलेले कोरोनाव्हायरसचे संकट ओळखून विष्णुपंत दसगुडे कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी व सामाजिक जाण ओळखून मुख्यमंत्री निधीस दिलेली मदत या दोन्ही कुटुंबियांच्या सामाजिक बांधिलकीची भान दिसून येत आहे.