आमदार शंभूराज देसाई यांनी घेतली सुपने मंडलातील अधिकाऱ्यांची बैठक
तांबवे पुलाचे काम तात्काळ पूर्ण करा
तांबवे येथील पुलाचे काम रखडल्यामुळे या विभागातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाचे काम युद्धपातळीवर हाती घेवून येत्या चार दिवसांत ते पूर्ण करुन घ्यावे, अशा सक्त सूचना आमदार शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजभोज यांना दुरध्वनीवरुन दिल्या. तसेच उपस्थित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही पुलाच्या कामात चालढकल करु नका. दोन दिवसात दुचाकी वाहने पुलावरुन जाण्याचे नियोजन करा अशा सक्त सूचना केल्या आहेत.
सणबूर – महापुराच्या परिस्थितीत पाटण मतदार संघातील सुपने मंडलातील म्होप्रे, तांबवे, साजूर व केसे या गावांमध्ये कोयना नदीचे पाणी घुसले होते. या महापुराने मोठे नुकसान झाले आहे. शेतीबरोबर सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्याकरीता तातडीने पंचनाम्यांच्या कामाला लागा.
सुपने मंडलातील एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये याची काळजी घ्या, अशा सक्त सूचना आमदार शंभूराज देसाई यांनी कराड तालुका प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. नुकत्याच झालेल्या महापूरपरिस्थिती व अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील सुपने मंडलातील सर्व गावांची स्वतंत्र बैठक तांबवे फाटा येथील वेदांत मंगल कार्यालय येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस उपविभागीय अधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, शहर पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ, जिल्हा परीषद सदस्य प्रदीप पाटील, पंचायत समिती सदस्य सविता संकपाळ, हणमंतराव चव्हाण, प्रभाकर शिंदे, शिवाजी गायकवाड, लक्ष्मण देसाई, अविनाश पाटील, म्होर्पे सरपंच तुकाराम डुबल, आनंदा कळके यासह सर्व विभागाचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी आमदार देसाई यांनी पंचनाम्यांच्या कामात हयगय करु नये. नुकसानीची भरपाई तसेच सार्वजनिक मालमत्तेची पुर्नंबांधणी करण्याकरीता आवश्यक असणारा निधी शासनाकडून मंजूर करुन आणण्यास आपणास मदत होईल. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास शासन तयार आहे. त्यामुळे सुपने मंडलातील एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी.