पुणे – रवींदर दांडीवालच नव्हे तर संजीव चावलापासून अनेक भारतीय वंशाच्या व्यक्ती मॅचफिक्सिंगमध्ये गुंतल्या असल्याचे संकेत मिळत असून येत्या काही काळात देशातील मॅचफिक्सिंगची पाळेमुळे खणून काढली जातील, असे बीसीसीआयचे प्रयत्न असल्याचे एका माजी अधिकाऱ्याने सांगितले आहे.
टेनिसपासून क्रिकेटपर्यंत मॅचफिक्सिंगचे जाळे पसरवण्याबाबत बीसीसीआय़ दांडीवालवर लक्ष ठेवून असले तरी तो केवळ छोटा मासा असून देशातील अनेक मोठे मासे गळाला लावण्यासाठी बीसीसीआयच्या लाचलुचपत विरोधी समितीने एक योजना तयार केली आहे. ज्या व्यक्तींवर संशय आहे त्यांच्यावर सध्या लक्ष ठेवले जात आहे. तसेच त्यांचे फोनकॉल, ते कोणाला भेटतात किंवा यापूर्वी भेटले आहेत का, याचा सध्या शोध घेतला जात आहे. रवींदरने अनेक टेनिस सामने फिक्स केल्या आहेत व याबाबत सोमवारी अनेक पुरावे हाती लागलेले आहेत.
या भारतीय व्यक्तीचे लागेबांधे ऑस्ट्रेलियासह अनेक देशात असल्याचीही माहिती समोर येत असून याबाबत थेट कारवाई करता येईल याची चाचपणी केली जात आहे. रवींदरवर अनेक देशांमध्ये विविध स्पर्धेत फिक्सिंग केल्याचेही आरोप आहेत. याबाबत बीसीसीआयचा प्लॅन तयार झाल्यावरच सर्व चित्र
स्पष्ट होणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.