मुंबई-कार अपघातातून अद्याप पूर्ण बरा न झालेल्या ऋषभ पंतच्या जागी आगामी काळात होत असलेल्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये कोणत्या यष्टीरक्षक फलंदाजाची निवड करायची हा मोठा प्रश्न बीसीसीआयसमोर निर्माण झाला आहे. त्यासाठीच बीसीसीआयने एक शोधमोहिमही हाती घेतली आहे.
सध्या बीसीसीआयसमोर पंतचे पर्याय म्हणून इशान किशन व लोकेश राहुल हे दोन पर्याय आहेत. मात्र, राहुलची सध्याची कामगिरी पाहता त्याला संघात स्थान मिळेल का हा मोठा प्रश्न आहे. राहुल भारतीय संघाचा उपकर्णधार होता. त्याला त्यावरून हटवले गेले आहे. त्यामुळे ईशान किशनचा पर्यायावर शिक्कामोर्तब होऊ शकते, असेही बीसीसीआयच्या सूत्रांकडून समजत आहे.
सॅमसनचाही होणार विचार
ईशान किशन व राहुल यांच्यासह संजू सॅमसन याच्याही नावाचा विचार केला जाणार आहे. सॅजमसन यंदाच्या आयपीएल स्पर्धेत प्रचंड भरात असून यष्टीमागेही त्याची कामगिरी सरस होत आहे. तसेच तो फलंदाज म्हणून भक्कम असल्याने भारतीय फलंदाजी जास्त सशक्त बनणार आहे, असेही या सूत्रांनी सांगितले.