नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मास्टरकार्डसोबत शीर्षक प्रायोजकत्वासाठी करार केला आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेपासून भारतीय संघाचा शीर्षक प्रायोजक पेटीएमऐवजी मास्टरकार्ड असणार आहे. विशेष म्हणजे, पेटीएमने स्वत: आपले सर्व अधिकार मास्टरकार्डला देण्याची विनंती बीसीसीआय केली होती. ही विनंती बीसीसीआयने मान्य केली आहे.
आता भारतीय संघ सप्टेंबरच्या पूर्वी मायभूमीत एकही सामना खेळणार नाही. सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असणारा भारतीय संघ पुढे झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये टी20 विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने खेळणार असून या सामन्यांपासून मास्टरकार्डकडे शीर्षक प्रायोजकत्व असणार आहे. या करारानुसार आता मास्टरकार्डकडून बीसीसीआयला भारताच्या एका सामन्यानंतर जवळपास 3.8 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बायजूकडे 86.21 कोटींची थकबाकी
भारतीय संघाच्या जर्सीचे प्रायोजक असलेल्या बायजूचे बीसीसीआयची 86.21 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या वर्षी एप्रिलमध्ये एज्युटेक कंपनी असलेल्या बायजूने 2023मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपर्यंत आपला करार वाढवून घेतला आहे. बीसीसीआयने कराराच्या रकमेत 10 टक्के वाढ करून मुदत वाढवली होती.
दरम्यान, 2019मध्ये बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट सामन्यांसाठी पेटीएमचे शीर्षक प्रायोजकत्व चार वर्षांसाठी वाढवले होते. त्यासाठी पेटीएमला 2019 ते 2013 या काळासाठी 326.80 कोटी रुपये बीसीसीआयला देणे होते. 2019पासून प्रत्येक सामन्यासाठी पेटीएम 3.80 कोटी रुपये खर्च करत होते. मात्र, आर्थिक अडचणीपोटी पेटीएमने शीर्षक प्रायोजकत्व सोडण्याचा निर्णय घेतला. यासोबतच आपले अधिकार मास्टरकार्डला देण्याची विनंतीही बीसीसीआयकडे केली होती.