नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर आज सांयकाळी अँजिओप्लास्टी होणार आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
BCCI President Sourav Ganguly admitted to Woodland Hospital in Kolkata, West Bengal. More details awaited.
(file photo) pic.twitter.com/ps3mtE8tPJ
— ANI (@ANI) January 2, 2021
सौरव गांगुलीच्या छातीत दुखत असल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले. आज सकाळीच गांगुलीला बरं वाटत नसल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. कोलकात्याच्या वूडलॅन्ड्स हॉस्पिटलमध्ये सौरव गांगुलीवर उपचार सुरू आहेत. गांगुलीनं नुकताच त्याच्या मुलीसोबत जाहीरात केल्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्या जाहीरातीची चर्चा असताना या बातमीने क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
भारतीय संघाचा आक्रमक कर्णधार म्हणून गांगुलीची ओळख आहे. २००३ मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियाने १९८३ नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर नेटवेस्ट सीरिजमध्ये नमवल्यानंतर लॉर्ड गॅलरीत गांगुलीने जर्सी काढून केलेले सेलिब्रेशन आजही सर्वांच्या लक्षात आहे.
बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यानंतरही गांगुलीने अनेक चांगले उपक्रम राबवले. त्याच्या नेतृत्वाखाली कोरोना संकटातही इंडियन प्रीमिअर लीग यूएईत यशस्वीरित्या पार पडली. गांगुलीनं ११३ कसोटीत ४२.१७च्या सरासरीनं ७२१२ धावा केल्या आहेत. त्यात १६ शतकं व ३५ अर्धशतकं आहेत. ३११ वन डे सामन्यांत ११३६३ धावा त्यांनी चोपल्या. त्यात २२ शतकं व ७२ अर्धशतकांचा समावेश आहे.