हॉटस्टारशी एकमत न झाल्याचा परिणाम
मुंबई – हॉटस्टार व जिओ यांच्यात एकमत न झाल्याने अखेर बीसीसीआयने आयपीएलच्या सामन्यांचे मोबाइलवर थेट व मोफत प्रक्षेपण करण्यास जिओला मनाई केली आहे.
यंदा स्पर्धेचा तेरावा मोसम असून ही स्पर्धा अमिरातीत येत्या 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. हॉटस्टारशी सामन्यांच्या करारासंबंधी एकमत न झाल्यामुळे प्रेक्षकांची संख्या कमी होऊ शकते. त्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे सामने मोबाइलवरून पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या व जिओचे पॅकेज घेतलेल्यांना याचा फटका बसणार आहे. थेट प्रक्षेपणाचे हक्क असलेल्या हॉटस्टारशी जिओचा करार होणार होता. मात्र, चर्चेदरम्यान त्यांच्यात एकमत झाले नाही त्यामुळे जिओला सामन्यांचे मोफत थेट प्रक्षेपण करता येणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
करोनाच्या धोक्यामुळे प्रेक्षकांना मैदानात प्रवेशबंदी असल्याने मोबाइलवरूनच सामन्याचा आनंद लुटण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. जिओचे भारतात कोट्यवधी ग्राहक असून आयपीएलचे प्रक्षेपण भागीदार असलेल्या हॉटस्टारवरून त्यांना आंतरराष्ट्रीय तसेच आयपीएलचे सामने मोफत पाहता येत होते.
हॉटस्टार आणि जिओ यांच्यातील थेट प्रक्षेपणाच्या करारावर एकमत न झाल्याने आता ही सुविधा जिओला पुरवता येणार नाही हे देखील स्पष्ट झाले आहे. जिओशी असलेला करार मोडला असला तरीही येत्या काही दिवसांत पुन्हा चर्च करून यातून काही मार्ग काढता येईल का हे पाहता येईल, असे हॉटस्टारकडून सांगण्यात आले आहे.