बायर्न म्युनिकची बार्सिलोनावर मात
लिस्बन – लिओनेल मेस्सीसह बलाढ्य खेळाडूंचा भरणा असलेल्या बार्सिलोनाला बायर्न म्युनिककडून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
बायर्न म्युनिकने माजी विजेत्या बार्सिलोनाला 8-2 असे पराभूत करत थाटात उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात थॉमस म्युलर, फिलिप कोटिन्यो यांनी प्रत्येकी दोन, तर इवान पेरिसिच, सर्ज गॅब्री, जोशुआ किमिच आणि रॉबर्ट लेवांडोव्हस्की यांनी प्रत्येकी एक गोल झळकावून बायर्नच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दुसरीकडे बार्सिलोनाकडून फक्त लुइस सुआरेझला गोल करण्यात यश आले, तर बायर्नच्या डेव्हिड अलबाने स्वयंगोल बार्सिलोनाच्या नावावर दुसरा गोल नोंदला गेला. मात्र, तरीही त्यांच्या हातून सामना पूर्वीच निसटला होता.
आता उपांत्य सामन्यात बायर्नचा सामना मॅंचेस्टर सिटी विरुद्ध लियॉन यांच्यातील विजेत्याशी होईल. तर उपांत्य फेरीची दुसरी लढत पॅरिस सेंट जर्मेन आणि आरबी लेपझिग यांच्यात होणार आहे.
चॅम्पियन्स लीगच्या 8 वेळा झालेल्या बाद फेरीतील आठ गोल झळकावणारा बायर्न हा पहिलाच संघ ठरला आहे. जवळपास 69 वर्षांनी सहा गोलांच्या फरकाने पराभूत होणारा बार्सिलोना हा पहिलाच संघ ठरला आहे. या आधी 1951 साली इस्पेन्योलने बार्सिलोनावर 6-0 अशी मात केली होती. बायर्नने या स्पर्धेची 12 व्या वेळी उपांत्य फेरी गाठली.