करोनाबाबतच्या वृत्तामुळे माध्यमांवर संतप्त
बंगळुरू – करोनाची बाधा झाल्याचे वृत्त देताना सोशल मीडियावर माझ्याबाबतीत अनेक अफवा पसरल्या. यामुळे खूप निराश झाले. परिपूर्ण माहिती न घेता केवळ अफवा पसरवणे हाच हेतू यातून दिसून येतो, अशा शब्दात भारताची नवोदित बॅडमिंटनपटू एन. सिक्की रेड्डी हिने आपला संताप व्यक्त केला.
तिचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त पसरले होते. तिची शनिवारी दुसरी करोना चाचणी करण्यात आली व त्याचा अहवाल मात्र, निगेटिव्ह आला. आता तिला भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या येथे सुरू असलेल्या सराव शिबिरात सहभागी होता येणार आहे. दरम्यान, शिबिरात ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूही सराव करत असल्याने तिलाही करोनाची बाधा होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.
याबाबत या शिबिराचे आयोजक व राष्ट्रीय प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनीही संताप व्यक्त केला असून सोशल मीडियावर याबाबत अफवा पसरवत असलेल्यांवर टीका केली आहे. करोनाच्या बाधेपेक्षाही हा प्रकार चिंताजनक असल्याचेही सिक्कीने गोपीचंद यांच्यासह व्यक्त केले. जिला आता कोणताही धोका नसून ती आपल्या प्रशिक्षकांसह शिबिरात सरावाला प्रारंभ करणार आहे.
सिक्की आणि तिचे प्रशिक्षक व फिजिओथेरपिस्ट किरान छॅलागुंडला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे हे शिबिर बंद करण्यात आले होते. मात्र, आता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सोमवारपासून ते दोघेही हैदराबादला सुरू असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन शिबिरात दाखल होऊ शकणार आहेत. गोपिचंद अकादमीत सरावाला प्रारंभ करण्यापूर्वी 21 खेळाडू, प्रशिक्षक आणि साहाय्यकांच्या कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात सिक्की आणि किरान वगळता बाकी 19 जणांचे अहवाल नकारात्मक आले होते.