पोलीस अधीक्षक पाटलांकडून कारवाई
बारामती – फिर्यादीवर दबाव आणून प्रतिज्ञापत्रकावर सह्या घेतल्याबद्दल बारामती शहर पोलीस ठाण्यातील दोन तर आरोपींना गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिल्याबद्दल भिगवण (ता. इंदापूर) पोलीस ठाण्यातील एक अशा एकूण तीन पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी बडतर्फ केले आहे. या बडतर्फीमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. तात्या विनायक खाडे व भगवान उत्तम थोरवे (दोघे बारामती शहर पोलीस ठाणे) तर अभिजीत एकशिंगे (भिगवण पोलीस ठाणे) असे बडतर्फ करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोपट तुकाराम थोरवे (रा. म्हसोबावाडी, ता. पुरंदर जि पुणे) यांनी त्यांना झालेल्या मारहाणीविरुद्ध भिगवण पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस कर्मचारी अभिजीत एकशिंगे यांनी त्यांच्या मोबाइलवरुन संबंधित आरोपींना दिली असे निष्पन्न झाले आहे.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत व पोलीस त्याचा शोध घेत आहेत याची माहिती असूनही एकशिंगे यांनी त्याच्याशी झालेल्या संभाषणाची माहिती प्रभारी अधिकाऱ्यांना दिली नाही. गुन्हा दाखल झाल्याची माहिती आरोपींना नव्हती; मात्र एकशिंगे यांच्या फोननंतर आरोपी निघून गेले. त्यामुळे या गुन्ह्यात त्यांना अटक करता आली नसल्याचा ठपका एकशिंगे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, याचप्रकरणात बारामती शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले तात्या विनायक खाडे व भगवान उत्तम थोरवे यांनी आरोपींशी आर्थिक सलगी करून पोपट तुकाराम थोरवे या फिर्यादीवर दबाव आणून न्यायालयात प्रतिज्ञापत्रकावर सह्या करण्यास भाग पाडल्याचा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला आहे. त्यांचे कृत्य घृणास्पद व विकृत असून पोलीस दलाच्या सचोटीस न शोभणारे व शिस्तीस बाधा असल्याचे नमूद करत पोलीस अधीक्षकांनी या तिघांना बडतर्फ केले आहे.