गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
बारामती (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जपत येथील गिल्स प्रा.लि.कंपनीच्या वतीने बारामती तालुक्यातील सस्तेवाडी (आनंदनगर) गावातील मोलमजुरी करून उरनिर्वाह करणाऱ्या गरजू कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंचे (अन्नधान्य) किटचे वाटप करण्यात आले.
सध्या देशात आणि राज्यात कोरोना विषाणू संसर्ग यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण लॉगडाऊन असल्यामुळे लोकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सूप्रिया सुळे यांनी समाजातील गोरगरीब लोकांना मदत करण्याचे अवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत सामाजिक बांधीलकी म्हणून बारामती येथील गिल्स प्रा.लि. कंपनीच्या वतीने बारामती तालुक्यातील सस्तेवाडी (आनंदनगर) या गावातील मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाना एक मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे (अन्नधान्य) किटचे वाटप करण्यात आले.
बारामती शहरात भीलवाडा तसेच बारामती पॅटर्न अवलंबला जात आहे त्यामुळे बारामती शहर सील करण्यात आले आहे. तालुक्यातील गरजू व्यक्तींना देखील मदतीची गरज आहे हे ओळखून गिल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे प्रमुख दत्तात्रय सोडमिसे यांनी गरजू व्यक्तींना मदतीचा हात दिला.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काँग्रेस संभाजी होळकर, कामगार नेते आण्णा पवळ, गिल्स प्रा.लि.कंपनी बारामतीचे प्रमुख दत्तात्रय सोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुरक्षित अंतर ठेवून हे वाटप करण्यात आले
“कोरोनासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉक डाऊन आहे. बारामती शहर व तालुका देखील सील करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती शहरावर बारकाईने लक्ष आहे. बारामती कोरोनामुक्त करण्यासाठी भीलवाडा तसेच बारामती पॅटर्न अवलंबला जात आहे. या कालावधीमध्ये गरजू व गरीब व्यक्तींना मदतीची गरज आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी एक हात मदतीचा पुढे केला पाहिजे.”
-दत्तात्रय सोडमिसे, प्रमुख गिल्स प्रा. लि .कंपनी बारामती.