जळोची -शहरात करोनाच्या वाढणाऱ्या रुग्णांची संख्या कमी करण्याबरोबरच संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने बारामती शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार गुरुवारी (दि. 16) पहाटेपासून बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, एमआयडीसीतील उद्योग सुरू राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
बारामतीत मंगळवारी (दि. 14) करोना आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी राम बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, मुख्याधिकारी किरणराज यादव उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले की, करोना आजारासंबंधी याआधीच बारामतीत चांगले काम करण्यात आले आहे. त्यामुळे अधिक काळजी करण्याची गरज नाही. संसर्ग रोखण्यासाठी बंद करण्यात येणार असल्याने बंदच्या दरम्यान नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
एक हजार सीसीसी बेडची व्यस्था
शहरात एक हजार सी.सी.सी. बेडची व्यवस्था आहे. शिवाय शहरातील चार खासगी रुग्णालये करोनाच्या रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी राम यांनी नमूद केले.