तालुक्यात दिवसभरात ३९ पॉझिटिव्ह
जुन्नर (प्रतिनिधी) – जुन्नर तालुक्यात मंगळवारी (दि. 14) तब्बल 39 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
यात आर्वी-पिंपळगाव, नारायणगाव, जुन्नर, हापुसबाग, माणिकडोह, ओझर, औरंगपूर, हिवरे बुद्रुक, आळेफाटा, वारुळवाडी या गावांत आढळून आले आहेत. तालुक्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 183 झाली आहे. त्यांपैकी ॲक्टिव्ह 99 तर करोनावर यशस्वीपणे मात करणारे 81 जण आहेत. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन न केल्यास भविष्यात हा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटरमध्ये रविवारी तब्बल 170 संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने ही चाचणी पहिल्यांदाच होत असून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिक लेण्याद्रीकडे धाव घेत आहेत. या केंद्रात आजअखेर 1565 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले आहेत तर मंगळवारी येथून चौघांना सोडण्यात आले आहे. सध्या तालुक्यात 3582 जण क्वारंताइन आहेत.
करोना संसर्गाच्या पहिल्या चरणात जुन्नर तालुका हा ग्रीनझोन आणि करोनामुक्त तालुका म्हणून ओळखला जात होता. मात्र मार्च महिन्याच्या अखेर केवळ एक रुग्ण असलेल्या जुन्नर तालुक्यात मे महिन्याच्या शेवटी 22 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यानंतर मात्र रुग्ण दुप्पटीचे प्रमाण वेगाने वाढले. त्यामुळे भविष्यात असेच आकडे वाढण्याची शक्यता गृहीत धरून लेण्याद्री येथील बेड्सची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी सांगितले.