बारामती – राज्यभरातील (Gram Panchayat Election Results) ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून अनेक ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसने चांगली कामगिरी केली. बारामतीमध्ये भाजपचा पार सुपडा साफ करण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. त्यातच २० वर्षे ताब्यात असलेली ग्रामपंचायत देखील यावेळी भाजपच्या हातून निसटली आहे.
बारामती तालुक्यात भाजपाच्या गटाला एकही ग्रामपंचायत जिंकून आणता आली नाही. बारामती तालुक्यातील सांगवी येथील ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात होती. परंतु, तीदेखील राष्ट्रवादीच्या गटाने खेचून आणली आहे. बारामती तालुक्याचे लक्ष वेधून असलेल्या सांगवी ग्रामपंचायतीत अखेर 20 वर्षांनंतर परिवर्तन झाले आहे. भाजपचा पराभव करून राष्ट्रवादीने मोठ्या ताकदीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
सांगवी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने 15 पैकी आपले 10 उमेदवार निवडून आणून भाजपला मोठा धक्का दिला आहे. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांची माळेगाव साखर कारखान्यात सत्ता होती. त्याला राष्ट्रवादीने आधीच सुरुंग लावला आहे. आता चंद्रराव तावरे यांची 20 वर्षे असलेली गावची सत्ता देखील हातून गेली आहे.