-->

‘तृणमूल’सोडून ‘भाजप’वासी झालेल्या सुवेंदू धर्माधिकारींविरोधात ममता बॅनर्जींची ‘मोठी’ राजकीय खेळी

नंदीग्राम – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून येथील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यात सत्ताधारी तृणमूलचे अनेक महत्वाचे नेते आपल्या गोटात सामील करून घेत भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर कडवं आव्हान उभं केलं आहे. असं असलं तरी भाजपच्या खेळीला ममता बॅनर्जी देखील चांगला प्रतिकार करताना दिसत आहेत.

अशातच आज ममता बॅनर्जी यांनी एक मोठी घोषणा केल्याने राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी तृणमूलचे राज्यातील महत्वाचे नेते मानल्या जाणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश करत बॅनर्जींना मोठा धक्का दिला होता.

सुवेंदू अधिकारी यांच्यापाठोपाठ अनेक नेत्यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकला होता. अशातच आज ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करत सुवेंदू अधिकारी यांचं टेन्शन वाढवलं आहे.

सुवेंदू धर्माधिकारी यांनी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर २०१६ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. यामध्ये ते विजयी देखील झाले होते. मात्र गतवर्षी १९ डिसेंबरला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान, नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करत ममता यांनी थेट सुवेंदू यांना आव्हान दिलं आहे. ही घोषणा करताना बॅनर्जी यांनी नंदीग्राम आपल्यासाठी ‘लकी’ असल्याचाही उल्लेख केला.

याबाबत एका नामांकित वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी यंदा नंदीग्राम व भवानीपूर या दोनी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे.    

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.