पिंपळे गुरव – जुनी सांगवी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकेत सांगवी परिसरातील नागरिक आर्थिक व्यवहार करत आहेत. परंतु येथे येणाऱ्या ग्राहकांसोबत बॅंक कर्मचारी मराठीमध्ये संवाद साधत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची अडचण होत आहे. त्यामुळे ग्राहकांना समजेल अशा मराठी भाषेत संवाद करावा, अशी मागणी मनसेकडून बॅंक व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
बॅंकेचे व्यवस्थापक व कर्मचारी हे हिंदीत बोलत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना, मजुरांना तसेच भाजीविक्री करणाऱ्या व्यक्तींना त्यांची भाषा समजत नाही. त्यामुळे बॅंकेत व्यवहार करताना अडचणी येत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार शासकीय कार्यालय तसेच बॅंकांमध्ये मराठी अनिवार्य केली आहे. असे असताना येथील कर्मचारी ग्राहकांबरोबर हिंदीत संवाद साधत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे बॅंक प्रशासनाने लक्ष द्यावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
मंगेश भालेकर, सुरेश सकट, अलेक्झांडर मोझेस, राजू सावळे उपस्थित होते.