नेवासा,(प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून गृहखात्याच्या पोलीस दप्तरी विविध गुन्ह्यात नोंद असणाऱ्या नेवासा शहरातील गुन्हेगार इम्रान दारूवाला याला नगर जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्याची माहिती नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दप्तरी विविध गुन्ह्यात नोंद असलेल्या गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. इमरान दारुवाला याच्यावर एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आल्यानंतर गृहखात्याच्या पोलीस विभागाने दारुवाला याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची कारवाई केली. नेवासा शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या गुन्हेगारांच्या हद्दपारीची आणखी कारवाई करण्यात येणार असल्याचा सज्जड इशाराही निरीक्षक जाधव यांनी दिला.