बंगळुरू – जागतिक स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या कामगिरीला मागे टाकत आपल्या नावावर गोलसंख्या वाढवून विक्रम साकार करणारा भारताचा अव्वल फुटबॉलपटू सुनील छेत्री याच्याशी बंगळुरू फुटबॉल क्लबने दोन वर्षांचा करार केला आहे.
इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) बलाढ्य मानला जात असलेल्या बंगळुरू एफसीने भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार छेत्रीशी दोन वर्षांचा नवा करार केला आहे. या करारानुसार छेत्री 2023 सालापर्यंत बंगळुरू एफसीकडून खेळेल. लिओनेल मेस्सीच्या 75 आंतरराष्ट्रीय गोलसंख्येला मागे टाकत छेत्रीने 76 वा गोल केला होता.
भारतासाठी ही सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या छेत्रीशी दोन वर्षांचा नवा करार केला आहे. छेत्री 2013 साला बंगळुरू एफसीकडूनच खेळत होता. त्याने बंगळुरू एफसीकडून आतापर्यंत 203 सामन्यांत 101 गोल केले आहेत.
सहा वेळा एआयएफएफ वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावणाऱ्या छेत्रीने 2013 साली क्लबला पहिले आयएसएल लीगचे विजेतेपद मिळवून दिले होते. त्यानंतर त्याने फेडरेशन करंडक (2015 व 2017), इंडियन सुपर लीग (2018 व 19) आणि सुपर कप (2018) यासह आणखी पाच करंडक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.