सातारा – सुपर मार्केटस् व किराणा मालाच्या दुकानांमध्ये वाइन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करताना वारकरी संप्रदायाचे प्रमुख मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांनी टीकेची राळ उडवली होती. राज्यातील वजनदार नेत्यांची मुले दारू पितात, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्याविरोधात राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बंडातात्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याच्या चौकशीसाठी ते शुक्रवारी पोलीस ठाण्यात हजर झाले होते.
एक तास चौकशी झाल्यानंतर बंडातात्या पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. यावेळी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फलटण ग्रामीण पोलिसांनी बंडातात्यांना शुक्रवारी सकाळी नोटीस बजावली. त्यानंतर ते सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर व्हायला आले. त्यामुळे सातारा शहर, सातारा तालुका पोलीस, आरसीपीची एक तुकडी बोलावण्यात आली.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस मुख्यालाकडे जाणारा रस्ता दुपारी 12.30 वाजता बॅरिकेडस् लावून बंद करण्यात आला होता. त्यामुळे सातारकरांची अडचण झाली. पोलीस ठाण्याच्या परिसरात दोनशे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. बंडातात्या त्यांच्या वाहनातून दुपारी एक वाजता सातारा शहर पोलीस ठाण्याच्या आवारात आले. पोलीस उपाधीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची एक तास चौकशी करण्यात आली. पोलिसांनी बंडातात्यांचा जबाब नोंदवला. आवश्यकता असेल तेव्हा चौकशीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याची सूचना पोलिसांनी त्यांना केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर बंडातात्या दोनच्या सुमारास पोलीस ठाण्यातून बाहेर पडले आणि उपस्थितांना नमस्कार करून निघून गेले.
पाच दिवसांनी पुन्हा हजेरी
बंडातात्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन तपासात सहकार्य केले. त्यांना अधिक चौकशीसाठी बुधवार, दि. 9 रोजी पुन्हा बोलवण्यात आल्याची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली.