चंदीगड –पक्षाच्या वरिष्ठांना त्यांच्या तालावर नाचणारा मुख्यमंत्री हवा आहे, सक्षम मुख्यमंत्री त्यांना नको आहे. त्यामुळे लोकांनीच आपला मुख्यमंत्री आता निवडावा, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी पंजाबातील एका प्रचारसभेत काल केल्याने कॉंग्रेस पुढील अडचणी वाढल्या आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे येत्या रविवारी पंजाबात कॉंग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे असे सांगण्यात येते. पक्षात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करून निवडणूक लढवण्याची प्रथा नाही पण पंजाबातून ही मागणी वाढल्याने राहुल गांधी हे रविवारी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणार आहेत असे पक्षाच्या सूत्रांनीही सूचित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भूषवणारे नवज्योत सिद्धू यांनी वरील विधान केल्याने त्याला महत्त्व दिले जात आहे.
सिद्धू यांनी म्हटले आहे की चांगला पंजाब बनवण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्याच हातात असते. त्यामुळे जनतेनेच आता आपला मुख्यमंत्री निवडला पाहिजे. वरिष्ठ पातळीवर लोकांना त्यांच्यापुढे मान तुकवणारा मुख्यमंत्री हवा असतो, तुम्हाला असला मुख्यमंत्री चालेल काय, असा सवालही त्यांनी यावेळी केला. पंजाबात कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी दोन महत्त्वाचे दावेदार आहेत. त्यात सिद्धू हे स्वतःही दावेदार मानले जात असून विद्यमान मुख्यमंत्री चन्नी यांचेही नाव या पदासाठी पुन्हा घेतले जात आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे या दोघांपैकी कोणाच्या नावाची घोषणा करणार यावर कॉंग्रेसचे भवितव्य अवलंबून असणार आहे. चन्नी यांचे नाव घोषित झाल्यानंतर सिद्धू हे सहजासहजी ते मान्य करण्याची शक्यता नाही असे मानले जात आहे. कालचे त्यांचे हे वक्तव्य थेट कॉंग्रेस श्रेष्ठींनाच आव्हान आहे, असाही अर्थ यातून काढला जात आहे.