सासवडमधील फळबाजाराची व्यथा : नगरपरिषदेचे काढले वाभाडे
सासवड –काय तो वाघ डोंगार…काय तो बाजारील चिखल…एकदम ओकेच राडा… या डायलॉगद्वारे शेतकऱ्यांनी सासवड नगरपरिषदेच्या हद्दीत भरणाऱ्या फळ बाजाराची व्यथा मांडून नगरपरिषदेच्या कारभाराचे वाभाडे काढले.
सासवड फळ बाजारातील राडा संपूर्ण तालुक्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला. सासवड नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारा व दुर्लक्षामुळे सोशल मीडियामध्ये नेटकऱ्यानी प्रशासनाला चांगलेच घेरले. तर राष्ट्रीय बाजार गेला, आंतरराष्ट्रीय बाजार आला अशा शब्दात खिल्ली उडवली आहे. सोशल मीडियावर उडवली जात आहे. शेतकरी वर्गातही या प्रकारामुळे तीव्र संताप पाहायला मिळत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून सासवडचा भाजी व फळ बाजार म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ झाला आहे. सतत जागा बदलून शेतकरी वर्ग अक्षरशः हैराण झाला आहे. मनाला वाटेल तसा भाजी बाजार खेळण्यासारखा इकडून तिकडे फेकला जात आहे. गेल्या वर्षापासून हा बाजार सासवडच्या वाघ डोंगराजवळ भरवला होता. पण इथे असलेल्या चिखलाच्या साम्राज्यामुळे अक्षरश: घसरगुंडी सुरू आहे. शेतकरी या बाजारातून धड चालुही शकत नाही. अंगावर मालाची टोपल्या व कॅरेट घेऊन अनेक शेतकरी या राड्यात घसरून पडत आहेत. व्यापारीही त्यामुळे इकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे नुकसान शेतकऱ्यांचेच होत असून बाजारभाव ही मिळत नाही.
जागा खासगी, वसुली नगरपालिकेची
वाघ डोंगर परिसरातील जागा ही खासगी व्यक्तीची आहे. तरीदेखील सासवड नगरपालिका इथे शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करते. काहीही संबंध नसताना पालिकेचे ठेकेदार हे पैसे घेतात. इथे ना रस्ता, ना पाणी ना डोक्यावर छत मग पैसे जातात कुठे असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.