मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. देशपातळीवर ज्याप्रकारे पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. अगदी त्याच प्रकारे महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुकीचे वारे आताच वाहण्यास सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडींमधील पक्षांमध्ये जागा वाटपावरून धूसफूस सुरू असतानाच आज शुक्रवारी (29 डिसेंबर) शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये मातोश्रीवर तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. ही भेट जागा वाटपासंदर्भात होती की आणखी काही याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. राज्यातील राजकारणात 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर कधी काय होईल हे सांगता येत नाही. याच राजकीय उलथापलथीत पाच वर्ष निघून गेली आहेत. तर वेध लागले आहेत ते आगामी लोकसभा निवडणुकीचे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसह महायुतीमधील पक्षांमध्ये जागा वाटपावरून वाद रंगत असतानाच आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची माहिती पुढे येत आहे. आता ही भेट जागा वाटपासंदर्भात होती की, आणखी काही कारणाने हे अद्याप गुलदस्त्यात आहे.