कराची – पाकिस्तानमधील ग्वादर बंदरामध्ये आज सशस्त्र बलुच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईदरम्यान ८ दहशतवादी मारले गेले असल्याची माहीती मिळते आहे. बलुच दहशतवाद्यांनी ग्वादर पोर्ट ऍथोरिटी कॉम्प्लेक्सच्या परिसरामध्ये घुसून गोळीबाराला सुरुवात केली होती. बंदराच्या परिसरामध्ये काही स्फोट झाल्याचे आवाज देखील ऐकू येत होते.
बंदराच्या परिसरात बलुच दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलांची मोठी कुमक बंदराकडे पाठवून देण्यात आली असून या भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू झाली. या चकमकीदरम्यान ८ दहशतवादी मारले गेल्याचे मरकानचे आयुक्त सईद अहमद उमराणी यांनी सांगितले आहे.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या बंदी घातलेल्या बलुच दहशतवादी संघटनेशी संबंधित मजिद ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमांना लागून असलेला पाकिस्तानचा बलुचिस्तान हा प्रांत खनिज समृद्ध प्रदेश असून या प्रांतात चीनने मोठे खाण प्रकल्प उभारले आहेत.
खाण उद्योगात चीनने केलेल्या या गुंतवणूकीला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून विरोध केला जातो आहे. बलुच लिबरेशन आर्मीने यापूर्वी देखील चिनी प्रकल्पांवर अशा प्रकारचे हल्ले केले होते. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर या ६० अब्ज डॉलरच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर चीनचे हजारो कामगार काम करत असतात. चिनी कंपन्यांमुळे स्थानिकांना रोजगार मिळत नाही आणि खनिज संपत्तीचे बेसुमार शोषण केले जात असल्याचा आरोप बलुच बंडखोरांकडून केला जातो आहे.