अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार येथील पोलिस महेश मुरलीधर काळे यांनी शासकीय गणवेशामध्ये हातात बंदुकीचा वापर करून व्हिडीओ तयार केला. मात्र तयार केलेला हा व्हिडीओ त्यांना चांगलाच महागात पडला आहे. कारण हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
शासकीय गणवेशाचा आणि शस्त्राचा गैर उपयोग केल्याचे बेशिस्त आणि बेजबाबदार वर्तनाबदल पोलिस अंमलदार महेश काळे यांना पोलिस अधीक्षक डॉ.हरि बालाजी अमरावती ग्रामीण यांनी निलंबित केले आहे. परवा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक यांनी कारवाई केली.
अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार येथील पोलिस महेश मुरलीधर काळे यांनी शासकीय गणवेशामध्ये हातात पिस्टलसारख्या शस्ञाचा वापर करून व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
‘अमरावती जिल्ह्यात प्रवेश करताना दादागिरी आणि भाईगिरी दहा किलोमीटर लांबच ठेवून यायचं भाऊ.. अमरावतीत जो कायद्यात राहणार तोच फायद्यात राहणार.. कारण कसंय ना कायद्याचा बालेकिल्ला, ओन्ली अमरावती जिल्हा..’ असं या व्हिडीओत म्हटलं आहे. हा व्हिडीओ करताना काळे हे पोलिसांच्या शासकीय गणवेशात आहेत. सोबतच त्यांच्या हातात एक पिस्तुल देखील दिसत आहे.