पिंपरी -आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना सज्ज झाली आहे. नवीन कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून पक्षवाढीवर भर देण्यात आला आहे. तसेच महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काय रणनिती आखावी, या बाबत मार्गदर्शन करण्यासाठी निगडीत मंगळवारी (दि. 17) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला प्रमाण मानून बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात अनेक जण सामील होत आहेत. शिवसेनेची विचारधारा सोबत घेऊन आगामी महापालिका निवडणकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील इतर पक्षाचे कार्यकर्ते, नेते पदाधिकारी देखील पक्षप्रवेश करत आहेत. त्या सर्वांचा एकत्रित पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेऊन पक्षाची पुढील दिशा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मंगळवारी (दि. 17) रोजी सकाळी अकरा वाजता निगडीतील सिझन बॅंक्वेट हॉल येथे हा मेळावा होणार आहे. या वेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे विविध पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.