कराड – कराड उत्तर मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार शामराव उर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील यांनी मंगळवारी जोरदार शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठेतील स्व. पी. डी. पाटील यांच्या निवासस्थानापासून रॅलीस प्रारंभ झाला.
यावेळी कराड उत्तर मतदार संघातील हजारो कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या रॅलीत सहभागी झाले होते. आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचीही उपस्थिती होती. सलग चार वेळा कराड उत्तरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार बाळासाहेब पाटील यांनी आज 2019 च्या विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
सकाळी दुपारी सव्वा बारा वाजता येथील स्व. पी. डी. पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आ. बाळासाहेब पाटील हे अर्ज भरण्यास निघाले. यावेळी काढण्यात आलेली रॅली कृष्णानाका, उपजिल्हा रुग्णालय मार्गे विजय दिवस चौकात पोहोचली. तेथे स्वर्गीय पी. डी. पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर परत रॅली पुढे मार्गस्थ झाली. त्यानंतर बसस्थानकमार्गे दत्त चौकात ही रॅली गेली. तेथे आ. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची उपस्थिती होती. दीड वाजण्याच्या सुमारास नवीन तहसीलदार कार्यालयात जाऊन आमदार पाटील त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
या रॅलीमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस यांसह मित्र पक्ष व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर हे सर्व कार्यकर्ते लिबर्टी मैदानावर होणाऱ्या सभेसाठी उपस्थित राहिले.