अखेर माण-खटाव मतदारसंघ भाजपकडे

जयकुमार गोरे उमेदवार; उद्या अर्ज दाखल करणार; कार्यकर्त्यांचा जल्लोष

सातारा – सातारा जिल्ह्यात सर्वाधिक उत्कंठा ताणलेला माण-खटाव विधानसभा मतदारसंघ अखेर भाजपच्या वाट्याला आल्याचे आज जाहीर करण्यात आले. पक्षाकडून माजी आमदार जयकुमार गोरे यांना अधिकृत एबी फॉर्मही देण्यात आला आहे. गोरे हे गुरुवार, दि. 3 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माण-खटाव मतदारसंघावर भाजप, शिवसेना आणि रासप या महायुतीतील पक्षांनी दावा सांगितला होता. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी माण ही आमची जान असल्याचे सांगत या मतदारसंघातून रासपचाच उमेदवार उभा राहील, अशी भीमगर्जना केली होती.

राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या शेखर गोरे यांना मातोश्रीवरुन लढण्याची तयारी करण्याचे सांगण्यात आले होते तर माजी आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माण मतदारसंघ भाजपलाच मिळणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला होता. युतीच्या सर्वच घटक पक्षांनी माणवर दावा सांगितल्याने इच्छुक, कार्यकर्ते आणि जनतेत संभ्रम निर्माण झाला होता. मतदारसंघाबाबत सोमवारी निर्णय होईल, असे वाटल्याने कार्यकर्त्यांची उत्कंठा वाढली होती. जयकुमार गोरे आणि शेखर गोरे यांच्या समर्थकांकडून मतदारसंघ आपल्याच पक्षाला मिळणार असल्याच्या पोस्ट व्हायरल केल्या जात होत्या.

आजपर्यंत माण मतदारसंघातून शिवसेनेनेच निवडणूक लढवल्याने शेखर गोरेंचे समर्थक त्यांचा दावा करत होते तर दुसरीकडे आमचे लोकसभा निवडणुकीदरम्यानच आमची उमेदवारी ठरल्याचे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जयकुमार गोरेंचे कार्यकर्ते सांगत होते. भाजपने मंगळवारी दुपारी आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत माण मतदारसंघ भाजपाला मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. जयकुमार गोरे यांचे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून नाव जाहीर करून त्यांना सातारा येथे एबी फॉर्मही देण्यात आले. जयकुमार गोरे यांची उमेदवारी जाहीर होताच समर्थकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)