विजय काळेंऐवजी सिद्धार्थ शिरोळे, दिलीप कांबळेंऐवजी सुनील कांबळे यांना संधी
पुणे – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे स्वत: पुण्यातून लढण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, त्यांच्यासह पुण्यातील आठही जागांची यादी भाजपने जाहीर केली. यातील एकही जागा मित्रपक्ष शिवसेनेला देण्यात आली नसल्याने शहरात दिवसभर नाराजीनाट्य रंगले होते.
चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापले आहे. खासदार गिरीश बापट यांच्यानंतर रिकाम्या झालेल्या कसबा मतदारसंघात विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून विद्यमान आमदार दिलीप कांबळे यांचे तिकीट कापून त्यांच्याच घरात उमेदवारी ठेवत त्यांचे बंधू आणि विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवाजीनगर मतदारसंघातून विद्यमान आमदार विजय काळे यांचे तिकीट कापून माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र आणि विद्यमान नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांना संधी दिली आहे. अन्य 4 जागांवर मात्र विद्यमानांनाच संधी देण्यात आली आहे. यामध्ये शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक आणि भीमराव तापकीर यांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकांमध्ये भाजपने आठही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या होत्या. मात्र, भाजपच्या नव्या पॉलिसीनुसार 2019 साठी काहीतरी बदल होणार, हे निश्चित होते. त्यानुसार 4 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
कोथरूड – चंद्रकांत पाटील
पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवून महसूलमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आणि आता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहोचलेले चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असून, त्यांना पुण्यात संधी देण्यात आली आहे. कोथरूड मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. अत्यंत सुरक्षित असलेल्या मतदारसंघामध्ये कुलकर्णी यांच्यासह नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी कंबर कसली होती. मात्र, ऐनवेळी पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांचा हिरमोड झाला. त्याची भरपाई आता पक्ष कशापद्धतीने करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
सिद्धार्थ शिरोळे हे माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव असून ते विद्यमान नगरसेवक आहेत. तसेच ते पीएमपीएमएलचे संचालक आहेत. याशिवाय अन्य उमेदवारांमध्ये ते सर्वांत तरुण उमेदवार आहेत. 2014 मध्ये शिवाजीनगरमधून त्यांना उमेदवारी देण्याचा विषय सुरू होता. ऐनवेळी विजय काळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिरोळे यांचे तिकीट कापले आणि गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी सिद्धार्थ यांना शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा शब्द श्रेष्ठींकडून देण्यात आला होता. शिवाजीनगर मतदारसंघातील इच्छुकांची संख्या अन्य मतदारसंघांपेक्षा जास्त म्हणजे 32 होती.
कसबा – मुक्ता टिळक
गिरीश बापट हे लोकसभेत निवडून गेल्यानंतर या मतदारसंघात तर इच्छुकांची अक्षरश: जंत्रीच आहे. हा आधीपासून भाजपचा बालेकिल्ला असून, बापटांनी या मतदारसंघातून 24 वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. कसब्यात उमेदवारी मिळाल्यास तो आमदार झालाच अशी परिस्थिती होती. त्यामुळे विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांच्यासह अनेक विद्यमान नगरसेवक याठिकाणी इच्छुक होते. त्यांनी अनेकदा शक्तिप्रदर्शनही केले. तसेच बापट यांचा वारसदार त्यांची सून असेल असे तर्कही लढवले गेले. मात्र, अगदी सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या टिळक यांना उमेदवारी देण्यात आली. टिळक या लोकमान्य टिळकांच्या घराण्यातील असून भाजपच्या तिकिटावर त्या चारवेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
पुणे कॅन्टोन्मेंट – सुनील कांबळे
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दिलीप कांबळे यांचे राज्यमंत्रिपद औरंगाबादमधील एका प्रकरणामुळे काढून घेण्यात आले होते. त्याचवेळी त्यांना पुन्हा संधी मिळण्याची आशा धूसर झाली होती. त्यामुळे शिवाजीनगरप्रमाणेच या मतदारसंघातही इच्छुकांची संख्या अधिक होती. मात्र, हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. हा मतदारसंघ “कॉस्मोपॉलिटियन’ असल्याने कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे यांना येथे संधी देण्यात आली आहे. सुनील हे सध्या महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत.
वडगावशेरी – जगदीश मुळीक
वडगावशेरी हा भाजपने नव्याने बांधलेला भाग आहे. मूळत: या भागातील वस्ती ही प्रामुख्याने उपनगरांची असून, हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या बालेकिल्ल्याला 2014 मध्ये भाजपने सुरूंग लावला आणि जगदीश मुळीक हे या ठिकाणाहून निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा एकदा मुळीक यांनाच पक्षाने संधी दिली आहे. महापालिका निवडणुकीत या भागातील मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला होता. तर, लोकसभेलाही भाजप उमेदवाराला आघाडी मिळवून दिली होती. आता येथील मतदार कोणाच्या मागे उभे राहतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
पर्वती – माधुरी मिसाळ
पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांना सलग तिसऱ्यांदा पक्षाने संधी दिली आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी पक्षाचे शहराध्यक्ष पदही देण्यात आले आहे. या मतदारसंघात महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले हे इच्छुक होते. मात्र, मिसाळ यांनाच पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. मिसाळ या 2012 मध्ये प्रथम निवडून आल्या. त्याआधी त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2017 मध्येही त्या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत. पालिका निवडणुकीत येथील मतदार मोठ्या प्रमाणात भाजपच्या बाजूने राहिले आहेत.
खडकवासला – भीमराव तापकीर
विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनादेखील विधानसभेसाठी सलग तिसऱ्यांदा भाजपकडून संधी देण्यात आली आहे. वास्तविक या मतदारसंघात उमेदवार बदलणार, शिवसेनेला हा मतदारसंघ जाणार अशीच चर्चा सुरुवातीपासून होती. तसे पाहिले, तर खडकवासला मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तोंडातून भाजपने आणला होता. याठिकाणी शिवसेनेच्या इच्छुकांची संख्या मोठी होती. परंतु, आठही मतदारसंघ भाजपने स्वत:जवळच ठेवल्याने या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांचा विषय राहिला नाही आणि तापकीरांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे.
हडपसर – योगेश टिळेकर
विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांच्यावर विरोधकांनी अनेकदा शरसंधान केले. त्यांच्यावर अनेक आरोप झाले. व्हिडीओही व्हायरल झाले. त्यामुळे या मतदारसंघातील चेहरा बदलला जातो का, याविषयी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, पक्षाने योगेश टिळेकर यांच्यावरच पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातही पूर्वी कॉंग्रेसची सरशी होती. त्यानंतर शिवसेनेचे प्राबल्य याठिकाणी होते. मात्र, त्यानंतर या मतदारसंघात टिळेकर यांनी जम बसवला आणि 2014 च्या निवडणुकीत ते जिंकले होते. येथूनही अनेकजण शिवसेनेकडून इच्छुक आहेत.