उदयनराजे, शिवेंद्रराजेंची एकत्र रॅली; उमेदवारी अर्ज भरणार
सातारा – साताऱ्यात उद्या, दि. 1 ऑक्टोबर रोजी भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले हे अनुक्रमे लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत अर्ज भरणार असून त्यांची एकत्र रॅली सकाळी 10 वाजता गांधी मैदानावरून निघणार आहे. या रॅलीत पंधरा ते वीस हजार कार्यकर्ते सहभागी होतील, असा अंदाज आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, विनीत कुबेर, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, सहकारी संस्थांचे सदस्य, सरपंच उपस्थित राहणार आहेत. गांधी मैदानावरून ढोल-ताशाच्या निनादात निघणाऱ्या या रॅलीत कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीला प्रत्युत्तर देण्यासाठी या रॅलीत दोन्ही राजांचे समर्थक व भाजपचे निष्ठावंत सहभागी होणार आहेत. प्रत्यक्ष प्रचारासाठी दोन्ही उमेदवारांना फक्त 17 दिवस मिळणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, मतदारसंघाच्या विकासाचे कारण देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. उदयनराजेंच्या दोन महिने आधीच शिवेंद्रसिंराजे भोसले भाजपवासी झाले. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. आता दोन्ही राजांच्या विरोधात राष्ट्रवादीही आघाडी उघडण्याच्या तयारीत आहे.
शिवेंद्रराजे यांच्या तुलनेत उदयनराजे यांची मोठी परीक्षा असणार आहे. यावेळी राष्ट्रवादीची व्होट बॅंक सोबत नसल्याने दोन्ही राजांचे कौशल्य पणाला लागणार आहे. हे आव्हान ते कसे पेलणार, याची चर्चा आहे. उद्याच्या रॅलीत उदयनराजे व शिवेंद्रराजे एकाच वाहनातून जाणार भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची झाडून उपस्थिती असणार आहे. या रॅलीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे शक्तिप्रदर्शन होणार आहे. राजवाडा, मोती चौक, देवी चौक, शेटे चौक, पोलीस मुख्यालयमार्गे रॅली पोवई नाक्यावर जाणार आहे. तेथे दोन्ही नेते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत. शिवेंद्रराजे हे विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्याकडे तर उदयनराजे हे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे सादर करणार आहेत.