पुणे : तब्बल सहा वर्षाच्या कालावधीत सावत्र वडिलांसोबत पोटच्या अल्पवयीन मुलीला संबंध ठेवण्यास भाग पाडल्याप्रकरणात आईला न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे.
18 वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल असलेल्या 38 वर्षीय महिलेला जामीन मिळाला आहे. त्या महिलेने ऍड. प्रताप परदेशी आणि ऍड. अजिंक्य खैरे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. सन 2014 ते 21 मार्च 2020 या कालावधीत ही घटना घडली. याबाबत बिबवेवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
आईला जीवे ठार मारण्याची धमकी देत सावत्र वडिलांनी पीडितेवर बलात्कार केला. विरोध केला असता फिर्यादीला मारहाण केली. याबाबत तिने आईला सांगितले. त्यावेळी तिने योग्य भूमिका न घेता वडिलांसोबत संबंध ठेवण्यास पीडितेला भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
न्यायालयीन कोठडीत असताना आईने जामिनासाठी अर्ज केला होता. यावर फिर्यादीने खोटी तक्रार दाखल केली आहे. तिचे तिच्यापेक्षा जास्त वय असलेल्या पुरूषाशी प्रेमसंबंध होते. याबाबतची माहिती आई-सावत्र वडिलाला कळली होती. त्यामुळे तिने खोटी तक्रार केली आहे. तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे तिच्या आईला जामीन देण्याची मागणी ऍड. अजिंक्य खैरे यांनी केली.