मुंबई – ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट या वर्षी 28 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने शाहीर साबळेंचा जीवन प्रवास महाराष्ट्राच्या घराघरात पोहचवला. चित्रपटातील डायलॉग.. गाणी सर्व काही सुपरहिट ठरलं. ‘बहरला हा मधुमास’ या गाण्याने तर सर्वांचीच मनं जिंकली. आता युकेमधील रेडिओ स्टेशनला देखील या गाण्याची भुरळ पडल्याचे समोर आले आहे.
या चित्रपटात मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसला होता. तर सना या चित्रपटात शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती साबळे यांच्या भूमिकेत दिसली होती. चित्रपटात सनावर चित्रित करण्यात आलेल्या ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. अनेक सोशल मीडिया इन्फ्ल्यूनसरने यावर रिल्स बनवत हे गाणं आणि त्याच्या हुक स्टेप्स खूप प्रसिद्ध केल्या. आता हे गाणं थेट युकेमधील रेडिओ स्टेशनवर वाजवलं जात आहे.
अंकुश चौधरीने याबाबतची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. याबाबतची पोस्ट शेअर करत अंकुश म्हणतो,”आपल्या मातीतल्या आपल्या मराठी गाण्याची भुरळ सातासमुद्रापार ‘बहरला हा मधुमास..’ युकेमधील आघाडीच्या सब्रास रेडिओवर (SABRAS RADIO ) १५ व्या क्रमांकावर वाजू लागलंय.” चाहत्यांनी मराठी गाण्याप्रती आपले प्रेम व्यक्त करत अंकुशच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु केला आहे.
View this post on Instagram
शाहीर साबळेंभोवती फिरणारा महाराष्ट्रातला तो जूना काळ, त्यावेळीचे राजकारण, समाजकारण, संस्कृती, आपलं स्वत:चा संघर्ष आणि कुटुंब या सगळ्यांचा आढावा या चित्रपटातून फार अनोख्या पद्धतीनं घेण्यात आला आहे चित्रपटात अंकुश चौधरी यांच्यासोबत अमित डोलावत, सना केदार शिंदे,अतुल काळे आदी कलाकार देखील होते. तर अजय अतुलने या चित्रपटासाठी संगीत दिले आहे.