नवी दिल्ली – भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने पुन्हा टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे. जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक जिंकून किदाम्बी श्रीकांतने ऐतिहासिक कामगिरी करत बॅडमिंटन जागतिक महासंघ (BWF) क्रमवारीत चार स्थानांनी झेप घेतली आहे.
28 वर्षीय के. श्रीकांतने स्पेनमधील हुएल्वा येथील जागतिक चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. या स्पर्धेत पहिले कांस्यपदक मिळवणारा युवा लक्ष्य सेनने दोन स्थानांनी झेप घेत 17व्या स्थानावर पोहोचला; परंतु बी. साई प्रणीत दोन स्थानांनी घसरून 18व्या स्थानावर आहे.
महिला एकेरीत दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू सातव्या स्थानावर कायम आहे, तर अनेक दुखापतींमधून सावरत सायना नेहवाल 25व्या स्थानावर आहे.
चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रॅंकीरेड्डी ही पुरुष दुहेरीतील जोडी एका स्थानाने घसरून 10व्या स्थानावर आहे. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांनी अव्वल 20 मध्ये स्थान मिळवले आहे.