दुबई – अॅशेस मालिकेतील दुसराही कसोटी सामना गमावणारा इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटला दुहेरी धक्का बसला आहे. आयसीसीने कसोटीमधील फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत रूटने पहिले स्थान गमावले असून त्याच्या जागी ऍशेस मालिकेत दमदार कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लेबुशेनने अव्वल स्थान पटकावले.
लेबुशेनने कारकिर्दीत पहिल्यांदाच 912 गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. ज्यो रूट 897 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऍशेस मालिकेआधी कसोटी क्रमवारीत लेबुशेन चौथ्या स्थानावर होता. ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या विजयात त्याने 74 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली व दुसऱ्या स्थानावर धडक मारली.
ऍडलेड कसोटीत लेबुशेनने एका डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले. लेबुशेनचे हे सहावे आणि ऍशेसमधील पहिले शतक ठरले. या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 275 धावांनी हरवून सिरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली.
मुंबईत न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद होण्याचा कर्णधार विराट कोहलीला फटका बसला. त्याच्या क्रमवारीत घसरण होऊन तो सातव्या स्थानावर आला. रोहित शर्मा हा टॉप-5 मध्ये कायम आहे. त्याच्या खात्यात 797 गुण आहेत. या दोघांशिवाय एकही भारतीय फलंदाज टॉप-10 मध्ये नाही.