आर्य भिवपाठकी व पूर्वा बर्वे यांना विजेतेपद

पुणे – आंतरराष्ट्रीय खेळाडू आर्य भिवपाठकी याने अपेक्षेप्रमाणे जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेतील पुरूषांच्या विभागात विजेतेपदावर मोहोर नोंदविली. महिलांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू पूर्वा बर्वे हिला अजिंक्‍यपद मिळाले. पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात घेण्यात आली.

आर्य व पूर्वा यांनी पाच पर्यंत अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. अग्रमानांकित आर्य याने अंतिम सामन्यात ऋषभ देशपांडे याच्यावर 15-21, 21-14, 21-15 अशी मात केली. पहिली गेम गमाविल्यानंतर त्याने स्मॅशिंग व सर्व्हिस यावर चांगले नियंत्रण ठेवीत विजयश्री खेचून आणली. दुहेरीत त्याने ऋषभच्या साथीत हर्षद भागवत व जयराज शक्तावत यांना पराभूत करीत विजेतेपद पटकाविले.

महिलांच्या अंतिम लढतीत बर्वे हिने तारा शहा हिचा 21-16, 21-16 असा पराभव केला. दुहेरीत आदिती काळे व कल्याणी लिमये यांना अजिंक्‍यपद मिळाले. या स्पर्धेतूनच आगामी राज्य अजिंक्‍यपद स्पर्धांसाठी पुणे जिल्हा संघाच्या खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्यामुळेच या स्पर्धेस विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.