Badminton Asia Team Championships 2024 :- भारताची दोन वेळची ऑलिम्पिक विजेती स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हीने येथे सुरु झालेल्या आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत थाटात विजयी पुनरागमन केले. तीच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय बॅडमिंटन संघाने बलाढ्य चीनवर ३-२ अशी मात केली व स्पर्धेत विजयी सलामी दिली.
या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने स्पर्धेच्या बाद फेरीतील स्थानही निश्चित केले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या दुखापतीनंतर सिंधू मोठ्या कालावधीनंतर कोर्टवर परतली होती. तीने चीनच्या अव्वल मानांकित हान हु हीच्यावर २१-१७, २१-१५ असी अवघ्या ४० मिनिटांत मात करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर महिला दुहेरीत तनिषा क्रास्टो व अश्विनी पोनाप्पा यांना चीनच्या लिउ शेइंग शोउ व टॅन निंग या जोडीकडून २१-१९, २१-१६ असा पराभव पत्करावा लागला. या विजयाने चीनने सांघिक गटात १-१ अशी बरोबरी केली. त्यानंतरच्या एकेरीच्या सामन्यात भारताच्या अस्मिता छलियाला चीनच्या वॅंग झी यीकडून २१-१३, २१-१५ अशी हार सहन करावी लागली.
Mumbai Open WTA 125K Tennis Tournament :लात्वियाच्या सेमेनिस्तेजाने पटकावलं विजेतेपद..
यावेळी चीनने २-१ अशी आघाडी घेतली होती. महिला दुहेरीच्या अन्य लढतीत भारताच्या ट्रीसा जॉलीने गायत्री गोपीचंदसह खेळताना चीनच्या ली यी जिंग व लुओ झु मिन या जोडीचा १०-२१, २१-१८, २१-१७ असा पराभव केला व गटात २-२ अशी बरोबरी केली. निर्णायक लढतीत भारताच्या अनमोल खर्बने अफलातून खेळ करताना चीनच्या वु लुओ यु हीच्यावर २२-२०, १४-२१, २१-१८ अशी मात करत संघाला ३-२ असा विजय मिळवून दिला.