मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला आयात केलेल्या लोकांना उमेदवारी द्यावी लागली. जगातील सर्वात मोठा पक्ष आणि ‘विश्वगुरु’ असे नेतृत्व असल्याच्या वल्गणा करणाऱ्यांकडे राज्यसभेसाठी उमेदवार नसावा यातूनच भाजप हा हवा भरलेला फुगा आहे तो कधीही फुटू शकतो हे दिसते.
आयारामांना उमेदवारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे हीच भाजपची पद्धत आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
टिळक भवन मध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, राज्यसभेची उमेदवारी आयात केलेल्या लोकांना देऊन कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलाव्या हा संदेश भाजपने दिलेला आहे. पक्ष वाढवण्यासाठी जे कार्यकर्ते आयुष्यभर मेहनत करतात त्यांना भाजप संधी देत नाही.
भिती दाखवून, दरोडे टाकून दुसऱ्या पक्षातील लोकांना भाजपत घेणे, दुसऱ्यांचे पक्ष फोडणे, चोरणे हेच काम भाजप सध्या करत आहे. भाजपमध्ये नेतेच नाहीत, कालपर्यंत ज्यांना ते ‘डिलर’ म्हणत होते त्यांनाच आता ‘लिडर’ म्हणण्याची वेळ भाजपवर आली आहे.
चंद्रकांत हंडोरे निष्ठावान!
काँग्रेस पक्षाने चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. हंडोरे हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, संघटना बांधणीत त्यांचे मोठे योगदान आहे, तसेच त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
काँग्रेस पक्षाने हंडोरे यांनी उमेदवार देऊन कार्यकर्त्यांचा सन्मान केला आहे. चंद्रकांत हंडोरे यांचा विजय नक्की आहे, दगाफटका करण्यास काहीही वाव नाही, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.