पिंपरी, (प्रतिनिधी) – गजानन बाबर हे स्वच्छ चारित्र्याचे नेते होते. शहरातील अनेक महत्त्वाचे प्रश्न त्यांनी खासदार या नात्याने मांडले. त्याला मंत्री म्हणून मी मान्यता देण्याचे काम केले. यामुळे शहरातील अनेक प्रश्न सुटले, अशा शब्दांमध्ये खासदार शरद पवार यांनी दिवंगत नेते गजानन बाबर यांच्या आठवणींनी उजाळा दिला.
दिवंगत माजी खासदार गजानन बाबर यांच्या जीवनरुपी संघर्षयात्री पुस्तकाचे प्रकाशन खासदार शरद पवार, संजय राऊत यांच्या प्रमूख उपस्थितीत झाले. या वेळी खासदार पवार बोलत होते. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे, माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, माजी महापौर संजोग वाघेरे, प्रकाश बाबर, योगेश बाबर, शिवसेना शहर प्रमुख अॅड. सचिन भोसले आदीसह विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी या वेळी उपस्थितीत होते.
खासदार पवार म्हणाले की, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये नेतृत्व तयार करण्याची धमक होती. विरोधकांवर कडवट टीका करणारे आणि प्रामाणिक मैत्री निभावणारे ठाकरे होते. त्यांनी अनेक सर्वसामान्य लोकांमधून नेतृत्त्व घडविले. त्यापैकीच एक गजानन बाबर होते. बाबर हे स्वच्छ चारित्र्याचे नेते होते.
शहरातील अनेक महत्त्वाचे प्रश्न त्यांनी खासदार या नात्याने मांडले. त्याला मंत्री म्हणून मी मान्यता देण्याचे काम केले. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे विकासाची दृष्टी मिळाली. त्यामुळेच पिंपरी-चिंचवड शहरात टाटांचा टेल्को उद्योग समूह आला. तसेच हिंजवडी येथे आयटी पार्कही उभारले. चाकण, तळेगाव, तळवडे, रांजणगाव आदीसह विविध ठिकाणी एमआयडीसी स्थापन केली.
सध्या शहरात आणखीन काही गोष्टी करायच्या आहेत. मिळालेल्या सत्तेचा वापर लोकांना सुविधा देण्यासाठी करायचा असतो. गजानन बाबर यांनी ते काम केले. त्यांचे संघर्षयात्री हे पुस्तक आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे पवार म्हणाले.
मी लक्ष घेतले अन हॅट्रीक हुकली
दिवंगत खासदार गजानन बाबर संघर्ष करत आमदार आणि खासदार झाले. ते सलग तीन वेळा आमदार झाले असते. मात्र मी त्यामध्ये लक्ष घातले. योग्य त्या दरुस्ती केल्या. अन गजानन बाबर यांची आमदारकीची हॅट्रीक हुकली अशी कबुली ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिली.