देहू, (वार्ताहर) – येथील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचे चौथे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे झाले. यावेळी पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांनी मिले सूर मेरा तुम्हारा गाण्यासह अनेक सादरीकरणातून स्नेहसंमेलनाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.
भारतातील सर्वच राज्यांमध्ये आढळणारी विविधता विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून दाखवून दिली. गणेशवंदनेने सुरुवात केली तर ग्रॅण्ड फिनाले मूल आणि आई, मूल आणि कुटुंब, मूल आणि शाळा, मूल आणि समाज यांतील सूर जुळल्या वरच ‘वसुधैव कुटुंबकम्’ सादरीकरणातून प्रेक्षकांची मने जिंकली.
यावेळी भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष हभप बाळासाहेब काशिद, कुलस्वामिनी महिला मंच मावळच्या संस्थापक, अध्यक्षा सारिका सुनील शेळके हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, उपाध्यक्ष अशोक कंद आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. स्केटिंगमधील विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. बसचालकांनी सलग तीन दिवस सेवा दिल्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. कविता अय्यर यांनी केले. सचिव प्रा. विकास कंद यांनी यावेळी पालकांशी संवाद साधला. विद्यार्थी दुर्वा काळुंके हिने सूत्रसंचालन केले तर पार्थ गरजे याने आभार मानले.