मुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. स्मारकातील पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढवण्यात येणार असून आता हा पुतळा ३५० फूटांचा असणार आहे.
तर स्मारकाची एकूण उंची ४५० फूट असेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुतळ्याची उंची वाढवण्याच्या सुधारित प्रस्तावाला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुतळ्याची उंची वाढणार असल्याने आता या स्मारकाच्या खर्चातही वाढ होणार आहे.
आधी स्मारकासाठी ७०९ कोटी रुपये प्रस्तावित खर्च होता तो आता ९९० कोटींवर जाणार आहे. पण स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली.
तसेच दोन वर्षांत स्मारकाचे काम पूर्ण करणार असल्याच्या आपल्या घोषणेचा त्यांनी पुनरूच्चार केला. राज्य सरकारच्या सर्व परवानग्या ह्या प्रत्येक विभागाच्या सचिवांनी ८ दिवसात पूर्ण करायच्या असे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या २१ तारखेला शरद पवार इंदू मिलला भेट देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
पुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे व लोखंडाचे प्रमाण वाढणार आहे. स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरविण्याची सोय असेल, ६८ टक्के जागेत खुली हरीत जागा असेल. तसेच या ठिकाणी ४०० लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग व कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह असेल. १००० लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल, अशी माहितीही पवार यांनी दिली.