मांडवगण फराटा -करोनाने देशात थैमान घातलेले असताना पोलीस, आरोग्य, महसूल विभाग एकत्रित लढत आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. पण शिरूर तालुक्यातील एक कुटुंब आहे की, ज्यामध्ये पिता पोलीस खात्यात आहे तर लेक डॉक्टर म्हणून काम करीत आहे. हे कुटुंब शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील रहिवासी आहे. संजय सातव हे कर्जत, जामखेड, श्रीगोंदाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत.
सातव हे उपअधीक्षक म्हणून दीड महिना कर्जतमध्ये ठाण मांडून करोना रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहेत. त्यांची लेक श्रद्धा या बालरोग तज्ज्ञ म्हणून पुण्यातील काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये 16 वर्षांखालील करोना बाधितांवर उपचार करीत आहेत. करोनाविरूद्ध लढाईत सातव बाप- लेकीचा वाटा निश्चितच कौतुकास्पद आहे.
उपअधीक्षक संजय सातव यांची पत्नी, मुलगी, मुलगा पुण्यात राहत आहेत. आई मांडवगण फराटा येथे राहत आहे. ते स्वतः कर्जत येथे सेवा बजावत आहेत. गेल्या 45 दिवसांत ते आईची भेट घेण्यासाठी फक्त दोन तास घरी गेले आहेत.