लॉकडाऊनमध्येही मार्केटिंग; बॅंक, पतसंस्थांकडून सभासदांना विचारणा
मांजरी – करोना आणि लॉकडाऊनचा फटका संपूर्ण अर्थव्यवस्थेला बसलेला असताना याचा परिणाम बॅंकांवरही झाला आहे. कर्जाचे हप्ते तीन महिने वसूल करू नयेत, असे केंद्र सरकारकडून सूचित करण्यात आले आहे. परंतु, कर्जाच्या माध्यमातून अर्थसंस्थांना मिळणारे उत्पन्न बंद झाल्याने कर्जाचा हप्ता राहू द्या, ठेव ठेवा नाहीतर नव्या योजनेत गुंतवणूक करता का…अशी विचारणा बॅंका, पतसंस्था, सोसायट्यांकडून सभासदांना होत आहे.
करोनामुळे शहर तसेच उपनगरांतील बराचसा भाग कंटन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णत: बंद आहेत. यातच बॅंका, पंतसंस्था तसेच सोसायट्यांकडून कर्जाचा हप्ता भरण्यासंदर्भात विचारणा होत आहे. अशा अर्थसंस्थांकडून हप्त्यासाठी आग्रही विनंती केली जात असली तरी हप्ता भरता येत नसेल तर गुंतवणूक योजना, वाढीव कर्ज तसेच अन्य योजना घेण्याचा आग्रह केला जात आहे. यासाठी सभासदांवर कर्मचाऱ्यांकडून प्रचंड दबाव आणला जात आहे.
कंटन्मेंट झोन म्हणून घोषित झालेल्या भागात बाजारपेठा, दुकाने बंद असली तरी बॅंकांचे कामकाज नियमीत सुरू आहे. बहुतांशी बॅंकांचा कर्मचारी वर्ग सध्या टेलिमार्केटिंगच्या कामावर आहे. या माध्यमातून बॅंकेच्या किंवा बॅंकेशी संलग्न विविध योजना सभासदांना विकण्याचे टार्गेट कर्मचाऱ्यांना दिले गेले आहे.
बॅंकांच्या कर्मचाऱ्यांना विशिष्ट टार्गेट पूर्ण करायचे असल्याने त्यांच्याकडून सभासदांना फोनाफोनी सुरू असते. काही बॅंकांचे अधिकारी वर्क फ्रॉम होम करीत असले तरी ते घरात बसुनच सभासदांना फोन करीत आहेत. त्यामुळे आर्थिक बाजुने त्रस्त झालेल्या सभासदांना बॅंकांचा असाही त्रास सहन करावा लागत आहे.
पैसे काढण्यावर अधिक भर…
लॉकडाऊन असले तरी नवी खाती उघडणे, कर्ज, ठेव योजना विकणे, बॅंकेच्या अन्य सशुल्क सेवा घेण्याबाबत सभासदांना विचारणा होत आहे. मात्र, सर्व व्यावसाय, कंपन्या तसेच कार्यालय बंद असल्या कारणाने सर्वांनाच आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे भरणा करण्याऐवजी ठेव मोडण्यावर तसेच पैसे काढण्यावर बॅंकेच्या सभासदांचा अधिक भर आहे. किमान, अशा सभासदांना तरी रोखण्यात यावे याकरिता बॅंकेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.