नवी दिल्ली : माजी मंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. आज सकाळी ईडी आणि आयकर विभागाकडून त्यांच्या रामपूर येथील निवासस्थानी छापे टाकण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. २०१९ मध्ये जौहर विद्यापीठाची जमीन हडप केल्याप्रकरणी आझम खान यांच्यावर ३० गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने त्यांना भूमाफिया घोषित केले. ईडीने आझम खान यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार ईडीने आज ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
आझम खान यांच्या घरावर आज सकाळी आयकर विभागाने छापा टाकला. आझम खान यांच्या अल जौहर ट्रस्टमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रामपूर, मेरठ, गाझियाबाद, सहारनपूर, सीतापूर आणि लखनऊमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी आयकर विभागाने माजी मंत्री आझम खान, त्यांची पत्नी तंजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला आझम यांच्या आयकर प्रतिज्ञापत्रांची पुनर्तपासणी सुरू केली होती.
VIDEO | Income Tax Department conducts raid on the premises of Samajwadi Party leader Azam Khan in UP’s Rampur. More details are awaited. pic.twitter.com/DCz9VIDHcr
— Press Trust of India (@PTI_News) September 13, 2023
विधानसभा निवडणुकीदरम्यान आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांनी दाखल केलेल्या आयकर प्रतिज्ञापत्रात अनेक अनियमितता आढळून आल्या होत्या. त्याचवेळी तपासादरम्यान आझम खान यांच्या पत्नी तंजीन फातिमाच्या बँक खात्यांमध्ये अनेक आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आले असून, या खात्यांमध्ये अनेक संशयास्पद व्यवहार आढळून आले हाेते.
जोहर ट्रस्टमधील अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहारही आढळून आले आहेत. आयकर विभाग आणि ईडी जवळपास तीन वर्षांपासून आझम खान, त्यांचे कुटुंबीय आणि जौहर ट्रस्टची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, आझम खान यांना समाजवादी पार्टीमध्ये अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याखालोखाल क्रमांक दोनचे नेते मानले जातातत्यामुळे त्यांच्यावरील ही कारवाई पक्षासाठी चिंतेची बाब असल्याचे म्हटले जात आहे.