मुंबई – मागील काही दिवसांपासून जालनामधील अंतरवाली येथील सराटी गावात मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. मात्र 1 सप्टेंबर रोजी येथील आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. याप्रकरणी सोमवारी सर्व राजकीय पक्ष व मराठा संघटनांची मुंबईत बैठक घेतली.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र सुरुवातीला या तिघांमधील झालेल्या संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरून राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत निष्काळजीपणा दाखवत असल्याची शंका उपस्थित होऊ लागली आहे.
नेमका काय आहे व्हिडिओमधील संवाद?
व्हायरल व्हिडिओमध्ये पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी ‘आपण बोलून मोकळं व्हायचं फक्त आणि निघून जायचं’, असे मुख्यमंत्री हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगताना ऐकू येत आहे. तर अजित पवार ‘हो आणि एस्’ असे म्हणताना ऐकू येते. त्यावर फडणवीस मान डोलावत माइक चालू असल्याचे सांगतात. त्यानंतर हे तिघेही बसतात. तेव्हा पवार देखील ‘हे ऐकू जातं’ असं म्हणत शिंदेंना सावध करताना दिसतात. त्यांचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील हा व्हिडिओ शेअर करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “सरकारला फक्त बोलून मोकळं व्हायचं आहे. जनतेच्या प्रश्नांना- समस्यांना उत्तरे द्यायचे नाही. अडचणीच्या प्रश्नांपासून पळवाट शोधणारे “नाकर्ते सरकार” राज्याचा कारभार हाकत आहे.”
सरकारला फक्त बोलून मोकळं व्हायचं आहे.
जनतेच्या प्रश्नांना- समस्यांना उत्तरे द्यायचे नाही.अडचणीच्या प्रश्नांपासून पळवाट शोधणारे “नाकर्ते सरकार” राज्याचा कारभार हाकत आहे. pic.twitter.com/lWpAuIT1s1
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 13, 2023
ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. “मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे.
मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे.
मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव… pic.twitter.com/172MQ4cxXH
— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) September 12, 2023
मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव पोटतिडकीने राज्यभर आंदोलन करीत आहेत. अनेकांनी अन्नत्याग केला आहे. विविध माध्यमातून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आपला मराठा तरुण करताना दिसतो आहे. तरीही हे सरकार केवळ वेळकाढूपणा करीत आहे. एकीकडे समाज जीवन मरणाचा संघर्ष शांततेच्या माध्यमातून करीत असताना सरकारचे हे ट्रीपल इंजिन बघा किती गांभीर्याने हा विषय घेत आहेत.. आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा पण, किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका. समाज आता तुमच्याकडे डोळसपणे बघतोय…” असे ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी थोडा वेळ लागणार असल्याने जरांगेंनी उपोषण मागे घेण्याची विनंती या पत्रकार परिषदेमध्ये केली. अंतरवाली सराटीतील गावकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात आल्याचे सांगितले. लाठीमार करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर बदली आणि निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यायचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.