Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे नवीन रामलल्ला मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर मंगळवारपासून (दि. 23) सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविक, स्थानिक आणि इतर राज्यांतील अभ्यागत, अयोध्येतील मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी मंदिर मार्गावर मोठ्या प्रमाणात रांगा लावत आहेत. मुख्य कार्यक्रम संपल्यानंतरच आम्हाला दर्शनाची संधी द्यावी अशी मागणी भाविकांनी केली होती. त्यामुळे सध्या मंदिर परिसरात मोठी गर्दी झाल्याचं चित्र दिसून येत आहे.
तर, दुसरीकडे आता रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी भाजपने अयोध्यावारीचा टाइम टेबल तयार केला आहे. भाजपशासित प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांच्या मंत्रिमंडळासह अयोध्येत दर्शनाला येणार आहेत. त्यासाठी भाजपने प्रत्येक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दर्शनाची वेळही दिली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दर्शनासाठी 5 फेब्रुवारीची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे आणि त्यांचं मंत्रिमंडळ 5 फेब्रुवारी रोजी अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतानाच शरयू किनारी महाआरतीही करणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील असणार आहेत.
– 31 जानेवारीला त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि मंत्री दर्शनाला जाणार
– 5 फेब्रुवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दर्शनाला जाणार
– 6 फेब्रुवारीला अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंत्री दर्शनाला जाणार
– 9 फेब्रुवारीला हरियाणाचे मुख्यमंत्री आणि मंत्री दर्शनाला जाणार
– 12 जानेवारीला राजस्थानचे मुख्यमंत्री आणि मंत्री दर्शनाला जाणार
– 15 फेब्रुवारीला गोव्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री दर्शनाला जाणार
– 22 फेब्रुवारीला आसामचे मुख्यमंत्री आणि 24 फेब्रुवारीला गुजरातचे मुख्यमंत्री दर्शनाला जाणार
– 4 मार्चला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंत्री दर्शनाला जाणार