जागृती: गर्दीच्या मागेच पालक का धावतात?

जगदीश देशमुख

मानवी जीवन हे पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीच्या वर्तुळामध्येच फिरत असते. प्रत्येकजण या तीन गोष्टी मिळवण्यासाठीच जगत असतो. मग करिअर म्हणून आपल्या पाल्याचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा हेच निकष का लावून बघत नाहीत.

आज कुठल्याही पालकाला विचारलं, तुमच्या मुलाने कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करावे, असे तुम्हाला वाटते तर, शंभरातील नव्वद पालकांची उत्तरे ही डॉक्‍टर, वकील, इंजिनिअर अशी असतात. पालक गर्दीच्या मागेच का धावतात, आपल्या पाल्याबाबत वेगळा विचार का करत नाहीत. डॉक्‍टर, वकील, इंजिनिअर यासोबत आपल्या मुलाने एक उत्तम कलाकार व्हावे, क्रीडापटू व्हावे असा पालक का विचार करत नाहीत. डॉक्‍टर, वकील, इंजिनिअर ह्या क्षेत्रामध्ये फक्‍त पैसा आहे; पण कलाकार आणि क्रीडापटू या क्षेत्रामध्ये पैशासोबत प्रसिद्धीही आहे आणि प्रतिष्ठाही.
एकूण 64 कला आहेत आणि जवळपास 100 च्या आसपास क्रीडाप्रकार जगभरात स्पर्धात्मक पद्धतीने खेळले जातात. किमान 50 टक्के विद्यार्थी जे खेळांमध्ये रमतात त्यांच्यासाठी जर क्रीडाक्षेत्र हेच करिअर बनले तर त्याहून मोठा आनंद काय? पालकांनी, शाळेतल्या शिक्षकांनी मुलांमधील गुण हेरले पाहिजेत आणि त्याला पैलू पाडले पाहिजेत.

करिअरची व्याप्ती आता इतकी मोठी झाली आहे की “खेळ’ फक्त वेळ घालवायचं, आनंदाचं साधन राहिलेलं नाही तर खेळांची आवड असणाऱ्याला आता खेळात करिअर करण्याच्याही खूप संधी उपलब्ध आहेत.सर्वप्रथम आपल्या पाल्याला कशामध्ये आवड आहे ते हेरावे लागेल आणि त्यानुसार त्याला मार्गदर्शन करावे लागेल. त्याच्या आजूबाजूला तशी वातावरण निर्मिती करावी लागेल. एकदा का पाल्याची मानसिकता बनत गेली की त्याला तुम्ही त्या त्या क्षेत्रातील प्रशिक्षण देऊ शकता.

क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे असल्यास अनेक क्‍लब, फेडरेशन आहेत. तिथे तुम्ही पाल्याला पाठवू शकता. उदाहरणच द्यायचे झाल्यास बुद्धिबळ या खेळाच्या प्रशिक्षणासाठी ऑल इंडिया चेस फेडरेशनने राष्ट्रीय केंद्राचीही स्थापना केली आहे. याला ऑनलाइनही खेळता येऊ शकते. टेनिस या खेळातही चांगले करिअर घडवता येऊ शकते. यासाठी कृष्णन टेनिस सेंटर, ब्रिटानिया अमृतराज टेनिस फाउंडेशन, एस टेनिस अकादमी, सिनेट टेनिस आदी संस्था कार्यरत आहेत.

संगीत, गायन, नृत्य, नाटक या कलाक्षेत्रात करिअर करण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर पुण्यातच विविध पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. राज्यात केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात बारावीनंतर शास्त्रीय संगीत, नाटक, नृत्य या कलांचे पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना तीन वर्षांचे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविले जातात. मनोरंजन क्षेत्रात काम करणारे विविध कलावंत तयार व्हावेत, हा उद्देश समोर ठेवून आवश्‍यक अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.

तुमचा मुलगा चांगला गातो किंवा चांगला अभिनय करतो तर त्याला तुम्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये का पाठवत नाही. तर त्यांचे उत्तर असते, इतके गायक आहेत इतके अभिनेते आहेत, आपल्या मुलाला कोण विचारतो. पण गायक किंवा फक्त अभिनेता म्हणजेच मनोरंजन क्षेत्र नाहीये. गायन क्षेत्रामध्ये फक्त गायक एकटाच काम करत नाही, वादक असतात, गाणी लिहिणारे कवी असतात. त्यांनाही चांगले पैसे मिळतात. प्रसिद्धी मिळते. अभिनय क्षेत्रामध्येही असेच आहे. सिनेमात काम करणारा अभिनेता आपल्याला दिसतो, पण सिनेमात केवळ एकटा अभिनेता किंवा अभिनेत्री काम करत नाही. तिथेही अनेक टेक्‍निशियन, लेखक, कवी, गझलकार, इतिहासकार, कन्टेन्ट रायटिंग, क्रिप्ट रायटर ह्यांची गरज असते. एक सिनेमा बनवायला जवळपास हजाराच्या आसपास कलाकार तिथे काम करत असतात. मग ह्या हजार लोकांमध्ये आपला पाल्य कुठे ना कुठे असेलच ना, त्याच्या कर्तृत्वावर पुढे पुढे येतच जाईल.

क्रीडा क्षेत्राचेही असेच आहे. तिथे तुमचा पाल्य उत्तम खेळाडू होऊ शकला नाही तरी त्याला अनेक वाटा मोकळ्या असतात. फिटनेस ट्रेनर्स, क्रीडा पत्रकारिता, क्रीडा समीक्षक किंवा समालोचक या पदासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कोणत्याही खेळात जर प्रावीण्य मिळवले तर केवळ प्रसिद्धीच मिळते असं नाही. तर करिअरही बनू शकते. मान-सन्मानाबरोबर बक्षिसांची खैरातही आता अद्वितीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर होत आहे. सरकारी, निम-सरकारी वा खासगी क्षेत्रात उत्तम पदावर नोकऱ्या उपलब्ध आहेत. वेळीस शैक्षणिक पात्रता डावलूनही भरभक्कम पगाराच्या नोकऱ्या चांगल्या खेळाडूंना मिळतात. गरज आहे ती योग्य वयात पूर्ण लक्ष केंद्रित करून मेहनत करण्याची. लहान वयात चमक दाखवणाऱ्या खेळाडूंना तर पुढील प्रवास खूपच सोपा होतो. चांगल्या प्रशिक्षकांखाली कठोर परिश्रम घेऊन त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊ शकते. हे सर्व खूप खर्चीक आहे असेही नाही. गरज आहे ती पाल्यापेक्षा पालकांच्या जागरुकतेची.

भारतात आता खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नव्हे तर व्यवसाय बनलाय. मग ते क्रीडासामग्री, क्रीडा पेहरावनिर्मिती असो किंवा कॉर्पोरेट जगतासाठी वेगवेगळे इव्हेंट आयोजित करणे असो. हे चांगले करिअर ऑप्शन आहेत. बहुतेक खेळांच्या व्यावसायिक लीगने आता भारतात चांगलाच पाय रुजवलाय. या लीगमुळेसुद्धा करिअरच्या किंवा व्यवसायाच्या खूप संधी उपलब्ध झाल्या आहेत. लीग मॅनेजर्स, टीम ऍडमिनिस्ट्रेटर्ससारख्या पदांसाठी वाढती मागणी आहे. स्पोर्टस्‌, मॅनेजमेंटची पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या मुला-मुलींना अशा बड्या पगाराच्या व जबाबदारीच्या पदांसाठी मोठी मागणी आहे. गरज आहे पालकांनी आपल्या पाल्याबाबत जरा हटके विचार करण्याची, वेगळं काही हवं असेल तर वेगळा विचार करून वेगळ्या वाटेने जावेच लागेल. नाही का.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)