52 वर्षांत मी सीट कधीच बदलली नाही ; शरद पवारांचा दलबदलूंना टोला

हर्षवर्धन पाटील यांच्या “विधानगाथा’ पुस्तकाचा शानदार प्रकाशन सोहळा संपन्न

मुंबई – महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा मी 26 वर्षे तर केंद्रातील संसदेचा 26 वर्षे अशी 52 वर्षे सदस्य राहिलो आहे. पण 52 वर्षाच्या कारकिर्दीत मी माझी सीट कधीच सोडली नाही, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडणाऱ्या दलबदलू आमदारांना टोला लगावला.

कॉंग्रेस नेते व इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या “विधानगाथा’ पुस्तकाचा प्रकाशन समारंभात सोमवारी विधिमंडळातील सेंट्रल सभागृहात पार पडला. चार माजी व आजी मुख्यमंत्री यांच्या हजेरीत झालेल्या या शानदार समारंभात हर्षवर्धन यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर उपस्थितांनी जोरदार कोपरखळ्या मारत प्रगल्भ राजकीय संस्कृतीचे दर्शन घडवले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले शरद पवार बोलत होते.

सोमवारी माझ्या जिभेची आणि गळ्यावर शस्त्रक्रिया झाली. डॉक्‍टरांनी कोणत्याच कार्यक्रमाला जायचे नाही, कोणाशीही बोलायचे नाही, असे सांगितले आहे. तरी मी आज आवर्जून उपस्थित राहिलो. कारण मी आलो नसतो तर मी गिरिश महाजन यांच्याबरोबर अमित शहा यांना भेटायला गेलो, अशा बातम्या आल्या असत्या असा चिमटा पवारांनी काढला.

तसेच 52 वर्षाच्या कारकिर्दीत मी माझी सीट कधीच सोडली नाही, असे सांगून दलबदलू आमदारांच्या भाजप प्रवेशाबाबत पवार यांनी टोलाही लगावला. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही सभागृहाचे सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, तसेच छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आदी दिग्गज उपस्थित होते.

हर्षवर्धन तुम्ही लवकरच या सभागृहात येणार आहात. घाबरु नका, तुमचा भाजप प्रवेश गिरीश महाजन व्यवस्थित पार पाडतील, असे म्हणत कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात हर्षवर्धन यांच्यावर सरळ सरळ बॉम्बच टाकला. तर देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले की जे करायचे ते करतातच, असे सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी केले. तसेच हषर्वधन, तुमचा पाच वर्षाचा विश्राम कालावधी यावेळी नक्की संपेल, असा चिमटा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढला.

प्रकाशन समारंभाचे निमंत्रण द्यायला मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो. त्याची छायाचित्रे व्हायरल झाली. त्यामुळे माझ्या पुस्तकाला प्रकाशनापूर्वी मोठी प्रसिद्धी मिळाली, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. मला निलंबन मंत्री म्हटले जात असे. माझ्या निलंबन निर्णयाचा सगळ्यात मोठा फटका गिरिश महाजन यांना बसल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले.

मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या राजकिय कोपरखळ्यांवर तुफान फटकेबाजी केली. हर्षवर्धन यांचे व्यक्तीमत्व लुभावणारे असे आहे. त्यांचे सर्व पक्षात मित्र आहेत. संसदीय कार्यपद्धतीचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. हर्षवर्धन यांची उणीव गेली पाच वर्षे आम्हाला जाणवली, असे फडणवीस म्हणाले. तसेच तुमचे एक माजी मुख्यमंत्री तुम्हाला सभागृहात येण्याला शुभेच्छा देत आहेत, तर दुसरे पुस्तके लिहा म्हणतात. या दोन माजी मुख्यमंत्र्यांनी तुमचे नेमके काय करायचं ठरवलंय, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित करताच सभागृहात हास्यस्फोट झाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)