जीवनगाणे: पैसा की लक्ष्मी?

अरूण गोखले

आपलं जीवन हे सुखासमाधानाचं असावं. आपल्याला एशोआराम मिळावा, घरात वैभव असावं, दारात गाडी असावी, तैनातीला नोकरचाकर असावेत. सुखाची सर्व साधने आपल्याकडे असावीत, असं प्रत्येकालाच वाटत असतं. ते तसं वाटणही काही चूक नाही. चूक होते ती नेमकी कुठे, तर हे सारं आपण कशा आणि कोणत्या प्रकारे मिळवतो याची.

त्याचं काय आहे, व्यावहारिक जगात या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला त्याचं मोल मोजावं लागतं. ते मोल मोजण्यासाठी धनाची गरज असते, पैसा हवा असतो. इथेच विचार सुरू होतो की, आपण आपल्या जीवनात नेमकं काय कमवायचं? पैसा कमवायचा का, लक्ष्मी गोळा करायची.
कागदी नोटा नाणी हे पैशाचं रूप आहे. धनधान्य, संपत्ती, जमीनजुमला, शेतीवाडी, विद्या, कलागुण ही लक्ष्मीची रूपे आहेत. ती वैभवदात्री महालक्ष्मी अष्टरूपाने आपल्या जीवनात भरून उरलेली आहे. मानवी जीवनातलं तिचं प्रत्येक रूप हे मोलाचं आहे.

पैशाची आपल्याकडे वेगवेगळी व्याख्या केली जाते. पू. बाबा महाराज सातारकर हे तर असं म्हणतात की, टेबलावरून येते ती लक्ष्मी आणि टेबलाखाऊन येतो तो पैसा. आता आपण पैसा कमवायचा का लक्ष्मी जोडायची ते आपण ठरवायचं असतं.

या संदर्भात तर तुकोबा हे आपल्याला तुम्ही धन हे उत्तम मार्गांनी कमवा आणि ते खर्च करतानाही विवेक आणि विचारांनी करा असाच सल्ला देतात.
शेतात घाम गाळून कमविलेली धान्य लक्ष्मी, कष्टाने, घामाने आणि सचोटीने मिळवलेली श्रमलक्ष्मी. सदाचार, नीती आणि सन्मार्गाने मिळवलेले धन याला कळत नकळत एक तृप्ती असते, शांती असते.

पैसा हा येताना दिमाख, डामडौल, अन्‌ सुखाची साधने घेऊन येतो. पण त्यातून मिळणारं सुखसमाधान, शांती किंवा तृप्तीचा आनंद मात्र किती आणि कसा असेल हे सांगता येत नाही. कारण वाममार्गांनी मिळवलेला पैसा हा त्याच चोर वाटांनी कधी निघून जातो ते कळतच नाही.
जग हे पैशाच्या तालावर जरी नाचत आणि नाचवत असलं तरी तो झटपट श्रीमंतीचा वाममार्ग आपण घ्यायचा का नाही, हे आपणच विवेक आणि विचाराने ठरवावे लागते. कुठेतरी थांबून हा विचार करावा लागतो की पैशाच्या सुखापेक्षा लक्ष्मीच्या आवकातून मिळणार सुखसमाधान, शांती ही महत्त्वाची नाही का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)